वीज कोसळल्याने हरबरा सुडी जळून खाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:23 AM2021-02-19T04:23:43+5:302021-02-19T04:23:43+5:30
चिखली तालुक्यात १८ फेब्रुवारीच्या सकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी ...
चिखली तालुक्यात १८ फेब्रुवारीच्या सकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, तालुक्यातील उत्रादा येथील शेतकरी रामेश्वर मनोहर इंगळे यांनी आपल्या गट नं.२.३४ मधील २.२५ हे.आर क्षेत्रावरील हरबरा पीकाची सोंगणी केल्यानंतर सुडी रचून ठेवली होती. या सुडीवर ही वीज कोसळल्याने संपूर्ण सुडी जळून खाक झाली आहे. यामध्ये शेतकरी रामेश्वर इंगळे यांचे सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही बाब कळताच महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. शेतकरी इंगळे यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला असल्याने या शेतकऱ्यास तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
--शेतकऱ्यांची चिंता वाढली--
तालुक्यात हा अवकाली पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोंगून ठेवलेल्या हरभरा पिकाच्या सुड्या पाण्याने भिजल्या आहेत. तथापि, ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, १८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत हवामाची अशीच स्थिती राहणार असल्याच्या अंदाज वर्तविण्यात आलेला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.