महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:44 AM2021-02-25T04:44:03+5:302021-02-25T04:44:03+5:30
बुलडाणा : विविध शासकीय कार्यालयांतील लाचखाेरांविरुद्ध एसीबीने माेहीम सुरू केली आहे. सन २०२० मध्ये बुलडाणा येथील ...
बुलडाणा : विविध शासकीय कार्यालयांतील लाचखाेरांविरुद्ध एसीबीने माेहीम सुरू केली आहे. सन २०२० मध्ये बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ सापळे यशस्वी केले आहेत. तसेच १६ लाचखाेरांवर कारवाई केली आहे. पाेलीस आणि महसूल खात्यात लाचखाेरांचे प्रमाण जास्त असल्याचे एसीबीच्या कारवायांवरून निदर्शनास येते.
पाेलीस विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मलकापूर रस्त्यावर ५० रुपयांची लाच घेणाऱ्या पाेलिसांवर एसीबीने केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली हाेती. एसीबीने महसूलमध्ये चार, वन विभागात एक, पाेलीस विभागात चार, जि. प. मध्ये तीन, कृषी विभाग १ अणि दाेन खासगी लाेकांवर कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्यांची नावे गाेपनीय ठेवण्यात येतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात येते. सन २०२० मध्ये एसबीच्या वतीने एकूण १४ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच २०२१ जानेवारी व फेब्रुवारीमध्ये तीन सापळे यशस्वी झाले आहेत. सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे तक्रार करावी.
-संजय चाैधरी, पाेलीस उपधीक्षक, एसीबी, बुलडाणा
५१ ते साठीतील कर्मचाऱ्यांना पैशांचा माेह आवरेना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांत ५१ ते ६० वर्षाचे सर्वाधिक कर्मचारी अडकल्याचे समाेर आले आहे. या वयाेगटातील सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
४१ ते ५० दरम्यान असलेल्या ५ कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत. सर्वाधिक पाच आराेपी पाेलीस विभागातील आहेत. तसेच महसूल विभागातील चार आराेपींवर कारवाई करण्यात आली आहे.
महसूल विभागातील ३० ते ४० दरम्याच्या दाेन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच वयाेगटातील एक पाेलीस कर्मचारीही एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. जिल्हा परिषदही भ्रष्टाचाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. खासगी दाेन व्यक्तींवर कारवाई झाली आहे.
सन २०२१च्या सुरुवातीलाच एसीबीने तीन सापळे यशस्वी केले आहेत. यामध्ये एक पाेलीस, एक महसूलचा कर्मचारी आणि एक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.