...म्हणून मराठमोळ्या वनाधिकाऱ्याने मुस्लिम ड्रायव्हरसाठी पाळले रोजे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 06:38 PM2019-05-31T18:38:34+5:302019-05-31T18:55:43+5:30
आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे.
बुलडाणा: येथील वन विभागात वाहन चालक पदावर कार्यरत असलेल्या एका मुस्लिम चालकाचे आरोग्य चांगले राहत नसल्याने यावेळी चालकाने रोजे ठेवले नाही. मात्र, आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे.
इस्लामी कालगणनेनुसार येणारा ९ वा महिना हा रमजानचा महिना असतो. रमजानचा महिना मुस्लीम धर्मियांसाठी विशेष महत्त्व दर्शवितो. या महिन्यात इस्लामचे श्रद्धावंत सूर्योदय ते सूर्यास्त कडक उपवास करतात. मुस्लिमांच्या धर्मातील अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणारा रमजानचा पवित्र महिना सध्या सुरु आहे. मुस्लिमधर्मीय लोक रोजे पाळतात, त्यामुळे बुलडाणा वन विभागातील उपवनसंरक्षक संजय माळी यांनी त्यांचा चालक जफर यास रमजान महिना लागण्याच्या एक दिवस आगोदर रोजा विषयी विचारलं, तेंव्हा त्याने कामाच्या तणावात व प्रकृतीच्या कारणाने आपल्याला रोजे पाळणे शक्य होऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी आपल्या मुस्लीम वाहनचालकाच्या वतीने स्वत: रोजे पाळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या धर्माला आड येऊ दिलं नाही. संजय माळी हे ७ मे पासून रोज पहाटे ४ वाजता उठतात आणि जेवण करतात. नंतर संध्याकाळी सात वाजता रोजा सोडतात.
१६ वर्षापूर्वी केला होता नवरात्राचा उपवास
उपवनसंरक्षक संजय माळी यांनी गत १६ वर्षापूर्वी नवरात्राचा नऊ दिवस कडक उपावास केला होता. तेंव्हापासून त्यांनी कुठलाच उपवास केला नाही. त्यामुळे माळी यांना उपवास पकडण्याची तशी सवय नसली तरी सध्या रोजा पकडलेला असताना कुठलीच अडचण त्यांना येत नाही. मुस्लीम बांधवाप्रमाणेच संपूर्ण नियमानुसार माळी हे रोजा पाळत आहेत.
रोजे पाळलेले असताना कुठलाच त्रास होत नाही. रोजा दरम्यान उत्साह वाटत आहे. श्रमदानही केले. तसेच दैनंदिन कामाकाजातही अडथळा नाही. व्यायाम, खेळ पूर्वीप्रमाणे सर्व व्यवस्थित सुरू आहे.
- संजय माळी, उपवनसंरक्षक, बुलडाणा.