सरपंचपदाची निवडणूक पुढे ढकलल्याने हिरमाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:07+5:302021-02-07T04:32:07+5:30
नुकत्याच निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक येत्या ९ ते ११ दरम्यान हाेणार आहे. डाेणगाव येथील सरपंचपदाची निवडणूक ही ...
नुकत्याच निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक येत्या ९ ते ११ दरम्यान हाेणार आहे. डाेणगाव येथील सरपंचपदाची निवडणूक ही जाहीर झाली हाेती. वाॅर्ड क्रमांक एकमधील ओबीसी महिला उमेदवार यांचा अर्ज चुकल्याने त्या ठिकाणी एकच उमेदवार शिल्लक राहिला होता. अशातच नागपूर न्यायालयाने गाजाला बी सद्दाम शाह यांना पुढील आदेशाच्या अधीन राहून निवडणूक लढण्यासाठी दिलासा दिला हाेता. त्यांनी या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये निवडणूक लढली होती; मात्र यावर ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्णयात ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीला २४ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली.
डोणगाव येथील वाॅर्ड क्रमांक एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला उमेदवार यामध्ये गाजाला बी सद्दाम शाह यांनी उमेदवारी अर्जामध्ये स्त्रीचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे त्यांचा अर्ज ओबीसीच्या सर्वसाधारणसाठी ग्राह्य धरण्यात आला हाेता. त्यामुळे सलमा बी सय्यद नूर अतार यांचा एकच अर्ज येथे शिल्लक राहिला होता; मात्र ऐन वेळेवर नागपूर खंडपीठाने पुढील आदेशाच्या अधीन राहून गजाला बी यांना ओबीसी महिला प्रवर्गात निवडणूक लढण्यासाठी परवानगी दिली होती. यामध्ये गजाला बी या विजयी झाल्या आहेत. अशातच ४ फेब्रुवारी रोजी नागपूर खंडपीठाने येथील सरपंचपदाच्या निवडणुकीवर स्थगिती देऊन ती महिला उमेदवार त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी लढण्यास पात्र होती की नाही हे पाहण्यासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी स्थगिती दिली.
एकीकडे येथील सरपंचपदासाठीच्या निवडणुकीमध्ये न्यायालयात जाणे हे नेहमीचेच आहे. २००७ मध्ये संध्या कैलास बाजाड व संदीप बबन पांडव हे सरपंचपदासाठी निवडणुकीमध्ये उभे होते. त्यावर न्यायालयातून स्थगिती आणली होती.