ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर!
By admin | Published: April 17, 2015 01:31 AM2015-04-17T01:31:47+5:302015-04-17T01:31:47+5:30
मलकापूर येथील इतिहासकालीन दरवाजांची दुरवस्था; ऐतिहासिक ठेवा जतन करावा
मलकापूर (जि. बुलडाणा): शहरात अस्तित्वात असलेले इतिहासकालीन दरवाजे ठिकठिकाणी खचले असून, त्यांची वेळीच दुरुस्ती न केल्यास इतिहासाच्या या खुणा नामशेष होतील. विशेष म्हणजे, हे दरवाजे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मलकापूर येथे मल्लिका राणीचे राज्य होते. त्यांच्या नावावरून मल्लिकापूर व आता मलकापूर असे नामकरण झाल्याची आख्यायिका आहे. शहराच्या रक्षणासाठी राणीने चोहोबाजूंनी तटबंदी बांधली होती तसेच त्यावर मोठी बुरुजे व दरवाजे बांधले. त्याकाळी येथे तोफ ठेवली जात असे. हे बांधकाम अत्यंत सुंदर व देखणे असून, आजच्या आधुनिक युगात असे बांधकाम होणे शक्य नाही. अंदाजे तीनशे वर्षांपूर्वी झालेले हे दरवाजांचे बांधकाम ठिकठिकाणी ढासळत असून, शहरातील तिन्ही दरवाजे जमीनदोस् त होण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय पुरातत्त्व विभाग तसेच नगर परिषदेला दरवाजांच्या दुरुस्तीकरिता वेळ नाही. शहरातील मंगलगेट परिसरातील दरवाजाचे काम काही दिवसांपूर्वी नगर परिषदद्वारे सुरू करण्यात आले होते; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम बंद पडलेले आहे. छोटा बाजार व गांधी चौक येथील दरवाजांचे अनेक भाग कोसळले आहेत. त्यामुळे कधीही हे दरवाजे कोसळू शकतात. या दरवाजांजवळ काही नागरिकांनी त्याठिकाणी अस्तित्वात असलेली ऐतिहासिक अशी शहराच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेल्या तटबंदीची भिंत तोडून आपले घर उभारले. या दरवाज्याच्या बाजूला पुरातन काळी दारूगोळा व इतर साहित्य ठेवण्याकरिता मोठय़ा खोल्या बांधलेल्या होत्या. त्या खोल्यासुद्धा येथील रहिवाशांनी तोडून आपल्या घरामध्ये समाविष्ट करण्याचे कार्य चालू केले असून, पुरातन अशा या वास्तूच्या खुणा मिटविण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पुरातत्त्व विभागाने देखरेखीकरिता नगर परिषदेला हस्तांतरित केलेले असतानासुद्धा नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे.