खामगावात उद्यापासून ऐतिहासिक शांती महोत्सव; देशभरातील लक्षावधी भाविकांची लाभणार उपस्थिती
By अनिल गवई | Published: October 8, 2022 12:13 PM2022-10-08T12:13:08+5:302022-10-08T12:14:04+5:30
खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली.
अनिल गवई
खामगाव: तब्बल ११४ वर्षांची परंपरा असलेल्या शांती उत्सवास रविवारपासून खामगावात प्रारंभ होत आहे. पुढील ११ दिवस भक्तीमय वातावरणात हा उत्सव पार पडणार असून, देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे जगदंबा (मोठी) देवीच्या दर्शनासाठी शांती उत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच भाविकांची रिघ लागते. हे येथे उल्लेखनिय!
खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली. तेव्हापासून देवीच्या ठाण्यांचा (जागा) बदलाचा अपवाद वगळता, शांती महोत्सवात कधीही खंड पडलेला नाही. अगदी कोरोना काळातही खामगावात साधेपणाने शांती महोत्सव साजरा झाला. यावर्षी निर्बंधमुक्त शांती उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे खामगावात चैतन्याचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी शांती महोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली आहे. शांती उत्सव देशात केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे. त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते. दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वषार्पासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.
आंध्रप्रदेशात देवीचे मुळ ठाणे!
आंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन येथे जगदंबा देवीचे मुळ ठाणे आहे. कै.कैरन्ना आनंदे (रा.लोहगाव ) देवीचे नि:स्सिम भक्त होते. खामगावात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी खामगावात शांती महोत्सवाला सुरूवात केली. तेव्हापासून खामगावात शांती महोत्सवाची प्रथा सुरू आहे.
देवीला शांत करण्यासाठी ११ दिवस आराधना!
विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते.
२४ तास दर्शन सुविधा
उत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांकरीता २४ तास आईचा दरबार खुला असतो. गर्दी नियंत्रणासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. उत्सव काळात दहा दिवस भाविकांनी दान केलेल्या साड्या, पातळे, चोळ्या यांचे मंडळाकडून गरजुंना वाटप केल्या जाते.