हिवरा आश्रम परिसर बनले पर्यटकांचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:35+5:302021-06-28T04:23:35+5:30
अंदाजे दीड ते दोन एकर परिसरात सुंदर फुलांची व शोभेची झाडे, कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी, घसरगुंडी, झोपाळा, हरिण, वाघ, ...
अंदाजे दीड ते दोन एकर परिसरात सुंदर फुलांची व शोभेची झाडे, कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी, घसरगुंडी, झोपाळा, हरिण, वाघ, छोटा भीम, डोरेमॉन यांच्या प्रतिमा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. अखंड वाहणारी जलधारा, लागूनच तलाव, भगवान बालाजी, शिवाची भव्य देखणी प्रतिमा दुसऱ्या बाजूला गाय, वासरांची गर्दी असलेली गो शाळा, मंदिरातून ऐकू येणारी प्रार्थना हे सर्व मनाला आनंद देणारे घटक पर्यटकांना खेचून घेत आहेत. आश्रमाच्या दक्षिण दिशेला असलेल्या कोराडी धरणातील सहा एकर बेटावर शेकडो नारळाची झाडे, चोहोबाजूंनी निळेशार पाणी व सुमारे वीस फूट उंचीची स्वामी विवेकानंदांची तेजस्वी मूर्ती माणसाला अंतर्मुख करते. सोबतीला बोटीचा आनंददायी प्रवास आणि हिवरा आश्रमाचा प्रसिध्द पेढा मनाचा गोडवा वाढवित असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
नैराश्य आलेल्यांना आनंद
लॉकडाऊनच्या काळात नैराश्य आलेल्या, तसेच कामाच्या व्यापात जीवनाकडे दुर्लक्ष झाल्याने आलेल्या ताणतणावात ही स्थळे नागरिकांना आनंदी करत असतात. संस्थेने या दोन्ही ठिकाणच्या विकासकामांसाठी स्वतः पुढाकार घेऊन लाखो रूपये खर्चूनही स्थळे निर्माण केली आहे.
पर्यटकांचा ओढा
जिल्हा व जिल्ह्याबाहेर असंख्य भाविक, पर्यटक या ठिकाणी भेट देत असल्यामुळे संस्थेने मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य केले आहे. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हे केंद्र मोफत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी निवास व भोजनाची व्यवस्था सुध्दा असल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधानाची भावना आहे.