हिवरखेडवासियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:24+5:302021-03-16T04:34:24+5:30
बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा व तढेगाव या दोन्ही रेतीघाटांना सील करण्यात यावे व संबंधित कंत्राटदारांवर तत्काळ ...
बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा व तढेगाव या दोन्ही रेतीघाटांना सील करण्यात यावे व संबंधित कंत्राटदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी हिवरखेडवासियांनी १५ मार्चपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा व तढेगाव येथील रेतीघाटांचा लिलाव एक महिन्यापूर्वी झाला असून, दोन्ही रेती घाटांच्या कंत्राटदारांकडून मनमानी कारभार सुरु आहे. त्यांच्याकडून शासनाच्या परिपत्रकाचे तसेच नियम व अटींचे कुठलेही पालन होत नसून, नदीपात्रात अवजड वाहने जसे टिप्पर व इतर वाहने पोकलेन व जे. सी. बी. यांचे माध्यमातून नदीपात्रातील रेतीचे उत्खनन करुन सपाटीकरणही याच दोन्ही पोकलेन व जे. सी. बी. मशीनच्या माध्यमातून होत आहे. लिलाव प्रक्रिया झाल्यापासून दोन्ही रेती घाटांमधून दहापट वाळूचे अवैधरित्या उत्खनन करुन वाहतूक झालेली आहे. मात्र, कंत्राटदारांच्या पावत्यांनुसार १,००० ते १,१०० ब्रॉस रेतीचे उत्खनन झाल्याचे दाखविले जात आहे. हा सर्व प्रकार सिंदखेड राजा तहसीलदार सुनील सावंत तसेच स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची लूट दिवसाढवळ्या केली जात आहे. नदीपात्राचा लिलाव केल्यानंतर ताब्यात देतेवेळीच्या व्हिडीओ क्लीप (दोन्ही घाटांची) देण्यात यावी तसेच सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासून नदीपात्राचे मोजमाप करुन त्याचा अहवाल देण्यात यावा, तढेगाव, हिवरखेड पूर्णा येथील रेतीघाटांच्या कंत्राटदारांवर अवैधरित्या रेती उत्खनन केल्याप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करुन हे रेतीघाट सील करण्यात यावेत. त्याचबरोबर संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी दोन्ही रेतीघाटांच्या कंत्राटदारांना पाठीशी घातल्याप्रकरणी त्यांच्यावरही तत्काळ गुन्हे दाखल करुन निलंबनाची कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी हिवरखेड पूर्णा येथील ग्रामस्थांनी १५ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिवरखेड पूर्णा येथील संतोष दराडे, सर्जेराव गायकवाड, कुंडलिक काकडे, प्रकाश गोरे व ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.