हिवरखेड प्राथमिक शाळेची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:21 AM2017-09-28T01:21:41+5:302017-09-28T01:21:51+5:30
किनगावराजा : येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेड पूर्णा येथील मुलांच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनगावराजा : येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेड पूर्णा येथील मुलांच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सदर शाळेची सुरुवात १९३४ मध्ये झाली असून, शाळेची इमारत इंग्रजकालीन असल्यामुळे या शाळेच्या इमारतीची आज रोजी अ त्यंत दुरवस्था झाली आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे हिवरखेड येथील पालक वर्गात तीव्र नाराजी दिसून येत आहे. या शाळेत एकूण ५ ते ६ खोल्या असून, जवळपास सर्वच खोल्या नादुरुस्त आहेत. चारही वर्गांच्या मुलांना एखाद्या खोलीत अथवा शाळेच्या व्हरांड्यामध्ये एकत्र बसावे लागत आहे. शाळेची पटसंख्या अंदाजे ७0 ते ७५ असून, पाण्यापावसात मुले दाटीने एकत्र बसविले जातात. या शाळेच्या दोन खोल्यावरील टिन उडून गेलेले आहेत. इतर खोल्या पाण्याने गळत आहेत. सदर शाळेची टिनपत्रे ५ जून २0१७ रोजी उडून गेल्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक शिंगणे यांनी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला असूनसुद्धा अद्यापपर्यंत अधिकार्यांकडून कोणतीच शाळा दुरुस्तीसाठी कार्यवाही झाली नाही. ही वास्तू इंग्रजकालीन असल्यामुळे शिकस्त शाळेचा १ मे २0१७ रोजी प्रस्तावसुद्धा मुख्याध्यापक यांच्याकडून पाठविण्यात आला आहे; परंतु वरिष्ठ मंडळी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. तरी संबंधित खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस् थांमधून होत आहे.
आम्ही आमच्यामार्फत शिकस्त शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे; परंतु त्यांच्याकडून कोणतीच चौकशी अथवा विचारपूस झालेली नाही.
- भारत शिंगणे, मुख्याध्यापक म.प्रा. शाळा, हिवरखेडपूर्णा.