कर्नकर्कश हाॅर्न पाेलिसांनाही ऐकू येताे; साडेपाच हजार रुपयांचा केला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:21+5:302021-06-26T04:24:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गत दीड वर्षापासून जिल्ह्यात काेराेना महामारीचे संकट आहे. प्रशासनाच्या वतीने वाहतुकीच्या नियमांचे पालन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत दीड वर्षापासून जिल्ह्यात काेराेना महामारीचे संकट आहे. प्रशासनाच्या वतीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, अनेकजण त्यांचे उल्लंघन करीत असल्याने वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. कर्णकर्कश हाॅर्न लावणाऱ्या ११ जणांवर गेल्या वर्षी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी काेराेना संसर्ग वाढल्याने लाॅकडाऊन करण्यात आला हाेता. त्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतरही सन २०२० मध्ये एक लाख ५८ हजार २४७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांकडून एक काेटी २५ लाख ९० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही अनेकजण नियमांचे उल्लंघन करतात.
फॅन्सी हाॅर्नची फॅशन
शहरातील अनेकजण दुचाकीला म्युझिकल हॉर्न, प्रेशर हॉर्न लावून रस्त्यांवरून आवाज करताना दिसून येतात. अशा म्युझिकल हाॅर्नची सध्या शहरासह ग्रामीण भागात क्रेझ निर्माण झाली आहे. गुंडगिरी प्रवृत्तींच्या युवकांच्या वाहनांना असे हॉर्न पाहावयास मिळतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशा कर्णकर्कश हॉर्न असलेल्या वाहनांवर कारवार्ई करून दंड वसूल करण्यात येतो.
कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर...
शहरातील अनेक प्रतिबंधित क्षेत्रांत हॉर्न वाजविण्यावर बंदी आहे. मात्र, असे असतानाही अनेक वाहनचालक प्रेशर हॉर्न वाजवून नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचे काम करतात.
वाहतूक पोलिसांना असे आढळून आल्यास अशांवर कलम ११९ / ११७ नुसार कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच वाहनचालकाला चलन देत त्यांच्याकडून ५०० रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जातो.
कानाचेही आजार वाढू शकतात
कर्णकर्कश हॉर्नमुळे कानाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. शहरात अनेक दुचाकीचालक कर्णकर्कश हाॅर्न वाजवून विनाकारण त्रास देण्याचे काम करताना दिसतात.
गतवर्षी दंडात्मक कारवाई केल्याने तसेच सुरुवातीलाच काेराेनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध लावल्याने कर्णकर्कश हाॅर्न लावणाऱ्याची संख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे. गेल्या वर्षीच्या कारवाईमुळे सन २०२१ मध्ये जानेवारी ते मेदरम्यान एकही दुचाकीचालक आढळला नाही.
नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. अनेकांवर दंडात्मक कारवाई करीत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी कर्णकर्कश हाॅर्न लावणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आल्याने असे हाॅर्न लावणाऱ्यांची संख्या घटली आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
एन. एम. परदेशी, वाहतूक शाखाप्रमुख, बुलडाणा