सैलानी येथे पेटली केवळ पाच नारळांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:57+5:302021-03-29T04:20:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव सराई : बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई (सैलानी) येथील होळी यात्रेवर कोरोनाचे सावट असून, पारंपरिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सराई : बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई (सैलानी) येथील होळी यात्रेवर कोरोनाचे सावट असून, पारंपरिक प्रथा कायम ठेवण्यासाठी शनिवारी येथे केवळ ५ नारळांची होळी पेटविण्यात आली.
सर्वधर्मसमभावाचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा दर्गा येथील नारळाची होळी देशभरात प्रसिध्द आहे. येथील दहा ट्रक नारळाच्या होळीचे देशभरातील भाविकांना आकर्षण असते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे सैलानी येथील होळी सलग दुसऱ्या वर्षीही रद्द झाली. दरम्यान, परंपरा खंडित न होऊ देता, सैलानी येथे लहान होळी पेटविण्यात येते. शनिवारी सायंकाळी सैलानी दर्ग्यासमोर मुजावर परिवाराने केवळ पाच नारळांची होळी पेटविली. यावेळी शेख रफिक मुजावर शेख, अस्लम मुजावर शेख, नजीर मुजावर, शेख चांद मुजावर, शेख शफीक मुजावर उपस्थित होते. त्याचबरोबर भाविकांनी वनविभागामध्ये छोट्या स्वरूपात होळी पेटवून त्यांची मनोकामना पूर्ण केली. मुजावर परिवाराने त्यांच्या घरासमोर घरगुती होळी पेटवून होळीची परंपरा कायम ठेवली आहे.
चौकट..
सैलानी येथे चोख पोलीस बंदोबस्त
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे सैलानी येथील होळी यात्रा रद्द करण्यात आली. सैलानी दर्गा परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी बुलडाणा पोलीसांनी शनिवारी सैलानी येथे चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी बुलडाणा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार खंडारे, रायपूर ठाणेदार सुभाष दुधाळ उपस्थित होते. कोरोना आपत्तीत साध्या पध्दतीने होळीची परंपरा साजरी करीत सैलानी येथील भाविकांनी प्रशासनाला सहकार्य केले.