लाभार्थींंना घरपोच धनादेशाचे वाटप
By admin | Published: July 2, 2016 12:56 AM2016-07-02T00:56:25+5:302016-07-02T00:56:25+5:30
‘आपल गाव आपला विकास’ उपक्रमाला लोणार तालुक्यात प्रतिसाद.
लोणार (जि. बुलडाणा) : 'आपले गाव आपला विकास; सुट्टीच्या दिवशीही कामकाज' या अभिनव उप्रकमानंतर सामाजिक बांधीलकी या नवीन अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाला १ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांच्या हस्ते लाभार्थींंना घरपोच धनादेशाद्वारे लाभ देऊन सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोर्मयादा असणार्या दारिद्रय़रेषेखालील लाभार्थींंना लाभ देण्यात येतो. शासनाने ही योजना १८ ऑक्टोबर २0१२ पासून सुरू केलेली असून, दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्री मृत्यू पावल्यास त्यांच्यासाठी या योजनेंतर्गत २0 हजार रुपये एवढी मदत दिली जाते. जनतेमध्ये शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, योजनांचा लाभ तत्काळ मिळावा, या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. तसेच या योजना स्थानिक पातळीवर महसुली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. मात्र शासनाच्या योजना जनजागृतीअभावी रखडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. याची जाणीव होऊन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी संबंधित कुटुंबास १५ दिवसांच्या आत सामाजिक बांधीलकी या उपक्रमांतर्गत घरपोच लाभ देण्यात येईल. म्हणजे लाभार्थीस कोणतेही कष्ट वा खर्च येणार नाही. यासाठी लाभार्थीस घटना घडल्यानंतर संबंधित गावच्या तलाठी किंवा तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.