एक लाख कुटुंबाच्या घेणार गृहभेटी!
By admin | Published: August 11, 2016 01:40 AM2016-08-11T01:40:32+5:302016-08-11T01:40:32+5:30
स्वच्छता अभियानातंर्गत शौचालय बांधण्याबाबत जागृती होणार.
बुलडाणा, दि १0 : स्वच्छता भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २0१६ दरम्यान ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटीह्ण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून जिल्ह्यातील ३३३ ग्रामपंचायतीमधील एक लाख कुटुंबाच्या गृहभेटी घेतल्या जाणार आहेत. यातून शौचालय बांधणे व वापरण्याबाबत जागृती करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ होत आहे. जिल्ह्यातील स्वच्छता अभियानात २0१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या ३३३ ग्रामपंचायतीत तसेच या वर्षात हगणदरीमुक्त होणार्या ग्रामपंचायतीत हे अभियान राबविण्यात येईल. या अभियानातून शौचालय नसणार्या कुटुंबांना ते बांधून वापरसाठी तर शौचालय असणार्या कुटुंबांना ते वापरासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने जवळपास एक लाख कुटुंबांना गृहभेटी देण्यात येणार आहेत.
या अभियान कालावधीत ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, ग्रामविकास, कृषी, नरेगा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या समन्वयातून स्वच्छतेसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न होणार आहेत. यात लोकप्रतिनिधी, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक यांचा सहभाग घेतला जाणार आहे. शिवाय यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने प्रशासकीय यंत्रणा सक्रिय राहणार आहे.