घरघुती हिंसाचार कायदा पुरुषांसाठीही हवा!

By admin | Published: May 25, 2017 12:29 AM2017-05-25T00:29:13+5:302017-05-25T00:29:13+5:30

लोकमत परिचर्चेतील सूर : कायद्याचा दुरूपयोग टाळायचा असल्यास जनजागृती आवश्यक

Homecoming Violence Act for Men! | घरघुती हिंसाचार कायदा पुरुषांसाठीही हवा!

घरघुती हिंसाचार कायदा पुरुषांसाठीही हवा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असून, घरघुती हिंसाचार कायद्यान्वये अनेक महिला न्याय मिळवत आहेत; मात्र अनेक प्रमाणात पुरुषांवर अन्याय होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे घरघुती हिंसाचार कायदा पुरुषांनाही लागू करावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पुरुषांवर अन्याय होणार नाही, असा सूर बुधवारी घरगुती हिंसाचार कायद्यात पुरुषांचा विचार व्हायला हवा का? या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला.
समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. यापूर्वी पुरूषप्रधान संस्कृतीमुळे व जुन्या रूढी, परंपरेमुळे महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते. त्यामुळे घरगुती हिंसाचार कायद्यान्वये महिलांना संरक्षण मिळाले; मात्र काही प्रकरणात महिला पुरूषांवर अत्याचार करीत असल्याचे समोर आले. त्यातून पुरूषांच्या आत्महत्येसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांप्रमाणे पुरुषांनाही घरगुती हिंसाचार कायद्यान्वये संरक्षण मिळण्याची मागणी होत आहे. कायद्यापुढे सर्व समान असतात. मग घरगुती हिंसाचार कायदा महिलांप्रमाणे पुरुषांसाठी लागू होणे आवश्यक आहे.
आज रोजी मोठ्या शहरात पुरुषांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत; मात्र अशा प्रकरणात पुरुषांना न्याय मिळत नाही. यासाठी असलेला कायदा महिलांच्या बाजूने असतो, यासाठी घरगुती हिंसाचार कायदा पुरुषांनाही लागू करावा, सर्वांना समान न्याय मिळावा, तर कायद्यापेक्षा समाजात जनजागृती करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया परिचर्चेत सहभागी मान्यवरानी व्यक्त केली.

भारतात पुरूषप्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीत पुरूषांचेच वर्चस्व आहे. सध्याच्या युगातही जग कितीही प्रगत झाले असले तरी समाजात स्त्रीयांपेक्षा पुरूषांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे स्त्रीया पुरूषांवर अन्याय, अत्याचार करीत नाहीच. परिणामी, घरगुती हिंसाचार कायदा हा पुरूषांसाठी नको आहे. त्याची काहीही गरज नाही. पुरूष आपल्या पत्नीवर अनन्वित अत्याचार करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र पत्नीने पतीवर अन्याय केल्याची उदाहरणे हेच सिद्ध करते की पुरूषांना या कायद्याची गरज नाही.
- अ‍ॅड. नंदकिशोर साखरे, बुलडाणा.

महिलांप्रमाणे पुरूषही कुटुंबांचा एक सदस्य असतो. त्यामुळे महिलेप्रमाणे घरगुती हिंसाचार कायद्यामध्ये पुरूषांचा विचार होणे गरजेचे आहे. यापूर्वी महिला कमी शिकलेली होती. तर समाजावर पुरूष संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण जास्त होते. मात्र आता प्रत्येक समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्या प्रमाणात विविध प्रकारच्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पुरूषांप्रमाणे महिलांकडूनही अत्याचार होऊ शकतो. त्यामुळे लोकशाही पद्धतीप्रमाणे सर्वांना समान हक्क मिळणे आवश्यक आहे.
-डॉ.शीतल इंगळे, सरपंच, सावळा-सुंदरखेड, ता.बुलडाणा.

घरगुती हिंसाचारामुळे अनेक महिलांचे आतापर्यंत बळी गेले आहेत. स्टोव्हचा भडका उडाल्याचे कारण दाखवित अनेक पुरूषांनी महिलांची हत्या केली, अशी हजारो उदाहरणे आहेत. अजूनही आपल्या देशातील महिला पुरूषांवर अत्याचार करतील एवढ्या सक्षम झालेल्या नाहीत. लग्न झाल्यावर एकटी महिला नवऱ्याच्या घरी जाते. तेथे नवऱ्याचे सर्व नातेवाईक असतात व पत्नी एकटी असते. त्यामुळे पतीवर अन्याय करणे सोपे नाही. त्यामुळे घरगुती हिंसाचार कायद्याची पुरूषांना मुळीच गरज नाही. उलट महिलांकरिता हा कायदा अधिक सक्षम व्हायला हवा.
- जयश्री अयाचित, गृहिणी, बुलडाणा.

प्रत्येक गोष्ट कायद्याने होत नाही. कायदा तयार झाला की पळवाटा निघतात. घरगुती हिंसाचार कायदा महिलांसाठी तयार करण्यात आला. त्यामुळे काही ठिकाणी पुरूषांवर अन्याय झाला. आता पुरूषांवर अन्याय होऊ नये, म्हणून घरगुती हिंसाचार कायदा पुरूषांनाही लागू केल्यास त्यातून पळवाटा काढणारे सदैव तयार असतात. अशा प्रकारे कायद्यात पळवाटा निघाल्यास कोणावरही अन्याय होऊ शकतो. यासाठी कायदा करण्यापेक्षा जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढत असून, महिला विविध क्षेत्रात पुढे आहेत. त्यामुळे कायदा करण्यापेक्षा जनजागृती आवश्यक आहे.
- पंजाबराव गायकवाड, बुलडाणा.

घरगुती हिंसाचार कायदा कडकपणे राबविण्यात येत आहे. त्यामागे महिलांचे वाढलेले शिक्षणाचे प्रमाण व समाजात झालेली जनजागृती होय; पण याचा फायदा घेऊन काही भगिनी घरातील पुरूषावर अन्याय करीत असल्याचे दिसून येते. कायदा महिलांच्या बाजूने उभा राहतो. त्यामुळे पुरूषावर अन्याय होतो. या कायद्याचा उलटा परिणाम झालेला दिसून येतो. त्यातून पुणे येथील होतकरू चित्रपट निर्मात्यांच्या आत्महत्यासारख्या घटना घडताना दिसून येतात. यासाठी कायद्याने नि:पक्षपणे विचार होणे आवश्यक आहे.
- अ‍ॅड. छाया जाधव, बुलडाणा

Web Title: Homecoming Violence Act for Men!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.