'बुलडाणा अर्बन'च्या रोखपालाचा प्रामाणिकपणा; खातेदारस परत केले ५० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:35 PM2018-09-26T17:35:59+5:302018-09-26T17:36:34+5:30
बुलडाणा अर्बनच्या मोताळा येथील शाखेचे रोखपाल शैलेंद्रसिंग रमणसिंग राजपूत यांनी कृतीतून त्याचा प्रत्यय दिला आहे. त्यांच्याकडे खातेदाराचे चुकून आलेले ५० हजार रुपये त्यांनी परत दिले.
मोताळा: समाजामध्ये आज विश्वसार्ह्यता लोप पावत आहे. मात्र अजूनही काही प्रसंग पाहता प्रामाणिकता व माणुसकी जिवंत असल्याची जाणिव होते. बुलडाणा अर्बनच्या मोताळा येथील शाखेचे रोखपाल शैलेंद्रसिंग रमणसिंग राजपूत यांनी कृतीतून त्याचा प्रत्यय दिला आहे. त्यांच्याकडे खातेदाराचे चुकून आलेले ५० हजार रुपये त्यांनी परत दिले. मोताळा येथील व्यावसायिक नितीन सुपे यांनी नेहमीप्रमाणे दुकानातील शिल्लक असलेली रक्कम सहकार्याच्या हाती पाठवून ती मोताळा येथील बुलडाणा अर्बनच्या शाखेत भरण्यासाठी पाठवली. मात्र दिलेली रक्कम ५० हजार रुपयांनी जास्त भरत असल्याचे रोखपाल शैलेंद्रसिंग राजपूत यांच्या निदर्शनास आले. त्याची माहिती त्यांनी शाखा व्यवस्थापक भागवत घिवे याना दिली. शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांनी त्या दिवशीचे सिसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर रक्कम सुपे यांची असल्याचे निष्पन्न झाले. व लोगल तशी माहिती नितीन सुपे यांना देण्यात आली. सदरची रक्कम २५ सप्टेंबर रोजी शाखा कार्यालयातील शाखा व्यवस्थापक भागवत घिवे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक सुनील कुटे, रोखपाल शैलेंद्रिसंग राजपूत यांनी नितीन सुपे यांना परत केली. यावेळी राजेंद्र झंवर, खातेदार व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. रक्कम परत मिळाल्यामुळे सुपे यांनी बँकेतील कर्मचार्यांचे आभार मानले.