वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन नोव्हेंबरपासून थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:28+5:302021-02-12T04:32:28+5:30
जिल्ह्यातील ९३६ वृद्ध साहित्यिक आणि कलावंताची जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे नोंद आहे. या कलावंतांकडून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्याचे ...
जिल्ह्यातील ९३६ वृद्ध साहित्यिक आणि कलावंताची जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे नोंद आहे. या कलावंतांकडून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्याचे काम सातत्याने केले जाते. मानधन दिले जाणाऱ्यांमध्ये वृद्ध साहित्यिक व कलावंतांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कलावंत, साहित्यिक, राज्यस्तरावरील व जिल्हा स्तरावरील कलावंत, साहित्यिकांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यामधून जिल्हास्तरावरील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन दिले जाते. पूर्वी हे मानधन जिल्हा परिषदेमार्फत दिले जात होते. मात्र, आता यामध्ये बदल झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांची यादी मंत्रालयाकडे पाठविण्यात येते. त्याठिकाणावरून हे मानधन कलावंतांना दिले जाते. परंतु, नोव्हेंबरपासून मानधन थकल्याने या कलावंतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मानधन किती (रुपये प्रतिमाह)
राष्ट्रीय पातळीवरील कलाकार, साहित्यिक - २,१०० रु.
राज्य पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १८०० रु.
जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १५०० रु.
मानधन दिले जाणारे जिल्हास्तरावरील कलावंत, साहित्यिक - ९३६
एकूण कलावंत, साहित्यिक- ७७८
--कोट--
कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. आता राज्य शासनाकडून दिले जाणारे मानधनही थकले आहे. त्यामुळे कलावंत वर्ग अडचणीत सापडला आहे.
हरिदास खांडेभराड, कलावंत
--कोट--
जिल्ह्यातील गरीब कलावंतांवर आलेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने मानधन तातडीने द्यावे. आज कलावंतांना पाहिजे तसे काम मिळत नाही. कलावंतांच्या समस्यांमध्ये वाढच होत आहे.
प्रमोद दांडगे, कलावंत
--कोट--
राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन रखडल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळात कलावंतांना कामही मिळाले नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन कलावंतांचे प्रश्न सोडवा.
दीपक सावळे, कलावंत
--कोट--
कलावंतांना मानधनाची प्रतीक्षा
जिल्ह्यात एकूण ९३६ लाभार्थ्यांपैकी ७७८ लाभार्थ्यांना मानधन दिले जाते. इतर लाभार्थी काही अडचणींमुळे मानधन बंद आहे. हे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.