एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड योजना सुरू करणार!

By admin | Published: October 2, 2016 02:38 AM2016-10-02T02:38:10+5:302016-10-02T02:38:10+5:30

अमडापूर येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले;यावेळी नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्याचे त्यांनी आदेश दिले.

Horticulture plantation scheme to be started in one lakh hectare area! | एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड योजना सुरू करणार!

एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड योजना सुरू करणार!

Next

बुलडाणा, दि. 0१- जिल्ह्यात कृषी विभाग व आत्मा यंत्रणेमार्फत शेतकरी कंपनी स्थापन करण्याचे मोठे काम झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता उत्पादक कंपनीसारखा मालक बनला आहे. त्याचप्रमाणे आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान देण्याचे कामही सुरू आहे. राज्याच्या कृषी क्षेत्राचा वेगाने विकास घडवून आणून, शेतकर्‍यांचे कल्याण करण्याचा प्रयत्न शासनाचा राहिलेला आहे. त्यासाठी राज्यात लवकरच शेतकर्‍यांना सुलभ असलेले कृषी धोरण आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.
चिखली तालुक्यातील अमडापूर येथे अमर विद्यालयाच्या मैदानावर शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांसाठी शनिवारला कार्यशाळा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प. सदस्य श्याम पठाडे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. इंगोले, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, सरपंच ललिता माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक नाईक, विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, बाजीराव डाळिंबकर, प्रकाश जवंजाळ, श्‍वेता महाले, अमडापूर कृषी उत्पादक कंपनीचे अजय देशमुख आदी उपस्थित होते.शेतकर्‍याला कायमस्वरूपी सुगीचे दिवस आणण्यासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा देणे आवश्यक असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, राज्यातील शेतकर्‍यांना जगाच्या स्पर्धेत आणण्यासाठी शासन त्यानुसार ध्येय धोरणे ठरवित आहे. शेतकर्‍यांचे कल्याण करण्याकरिता किंवा त्याचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी शेतमालाचे भाव नेहमी चढे हवेत. शेतमालाचे भाव ठरविणार्‍या केंद्रीय कृषी मूल्य आयोग व केंद्रीय आयोगाला भावाबद्दलची माहिती पाठविणार्‍या राज्य कृषी मूल्य आयोगामध्ये शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे लोक हवेत. जेणेकरून त्यांना शेतकर्‍यांची भाव न मिळाल्यामुळे होणारी आर्थिक ओढाताण लक्षात येईल. तसेच ते पुढे म्हणाले, राज्यात २ ऑक्टोबरपासून १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीची नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेला निधीची कमतरता राहणार नाही. बीटी कापसालाही आता किडींचा धोका वाढला आहे. त्याला खताचे डोसही वाढवून द्यावे लागत आहेत. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कमी पाण्यात व कमी दिवसात येणारे कापसाचे वाण विकसित करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासन कापसाचे अशाप्रकारचे बियाणे विकसित करणार आहे.याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, राज्य सरकारने फळे-भाजीपाला नियमन मुक्तीचा कायदा केला आहे, असा क्रांतिकारी निर्णय घेणारे हे शासन आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मुक्त बाजारपेठेचे स्वातंत्र्य अनुभवता येणार आहे. शेतकर्‍यांनी अनुदानावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होऊन शेती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री यांच्या हस्ते अमडापूर कृषी उत्पादक कंपनी व जिल्ह्यातील अन्य कृषी कंपन्यांच्या सभासदांना भागधारक प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले

Web Title: Horticulture plantation scheme to be started in one lakh hectare area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.