फायर ऑडिटविनाच शहरातील हॉस्पिटल सर्रास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:17+5:302021-08-23T04:36:17+5:30

बुलडाणा : रुग्णालयात शॉटसर्कीट होऊन आग लागू नये म्हणून फायर ऑडिट करणे गरजेचे असते. असे जरी असले तरी मात्र, ...

Hospitals in the city are rampant without fire audits | फायर ऑडिटविनाच शहरातील हॉस्पिटल सर्रास सुरू

फायर ऑडिटविनाच शहरातील हॉस्पिटल सर्रास सुरू

Next

बुलडाणा : रुग्णालयात शॉटसर्कीट होऊन आग लागू नये म्हणून फायर ऑडिट करणे गरजेचे असते. असे जरी असले तरी मात्र, शहरातील एक खासगी रुग्णालय वगळता कुठल्याही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे. तेव्हा शहरातील कोणत्याही रुग्णालयात कधीही आणि कसाही अनुचित प्रकार घडून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्निशमन विभागाने दिलेल्या नोटीसला शहरातील खासगी रुग्णालयांनी केराची टोपली दाखविली आहे हे विशेष.

बुलडाणा शहर हे वैद्यकीयदृष्ट्या झपाट्याने वाढत जाणारे शहर आहे. मागील दशकभरापासून शहरात नवे-जुने असे एकूण ७८ खासगी रुग्णालय वैद्यकीय सेवा देत आहेत. मात्र, या सर्वच्या सर्व खासगी रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी हा खेळ सुरू असून, शॉटसर्कीट वा इतर काही कारणांनी रुग्णालयात आग लागल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी मात्र, या रुग्णालयांचे संचालक या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा मोठी दुर्घटना झाल्यावरच या रुग्णालयांच्या संचालकाना जाग येईल का असा सवाल यानिमित्ताने विचारल्या जात आहे.

दोन वेळा बजावल्या आहेत नोटीस

नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करून घेण्यासाठी दोन वेळा नोटीस बजावल्या आहेत. मात्र, दोन्ही वेळी नोटीसला रुग्णालयांच्या संचालकांनी केराची टोपली दाखविली आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात येणार असून, यावेळी न ऐकल्यास योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली आहे.

जिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव मंत्रालयात

येथील खासगी रुग्णालयाबरोबरच जिल्हा सामान्य रुग्णालयाचेही फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने फायर ऑडिटसाठी लागणाऱ्या निधीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दाखल केल्याची माहिती आहे. तेव्हा या रुग्णलयाचेही फायर ऑडिट केंव्हा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याच शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असल्याची माहिती आहे.

रुग्णालयांनी फायर ऑडिट करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. मात्र, दोन वेळा नोटीस बजावूनही रुग्णालय फायर ऑडिट करीत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता तिसऱ्यांदा नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर फायर ऑडिट न झाल्यास कारवाई करण्यात येईल.

-विनोद खरात, सहायक अग्निशमन अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Hospitals in the city are rampant without fire audits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.