हॉटेलबंदीने हिरावला महिलांचा रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:32+5:302021-04-06T04:33:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील हॉटेलमध्ये पोळी, भाकरी करण्यासाठी काम करत असलेल्या महिलांचा रोजगार हिरावला गेला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नावाखाली शासनाने घेतलेला निर्णय या महिलांसाठी मारक ठरणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर शासनाने अनलॉक प्रक्रियेअंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सर्व व्यवसाय व एकंदरीतच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. परंतु, निर्बंध कमी केल्याने नागरिकांनी बिनधास्त व बेफिकिरीने वागण्यास सुरुवात केली. नियमांचे पालन न केल्याने गेल्या महिनाभरापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे राज्य शासनाने सुरुवातीला अंशत: लॉकडाऊन लागू केले. जिल्ह्यातही याप्रमाणे निर्बंध लावण्यात आले. तरीदेखील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने आता शासनाने पुन्हा कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शनिवार रविवारच्या कडक लॉकडाऊनसह राज्यभरातील सर्व हॉटेल महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने ५ एप्रिल रोजी घेतला.
महिनाभर हॉटेल बंद राहणार असल्याने हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होणार आहे. यासोबतच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचाही रोजगार बंद होणार आहे. शहरातील जवळपास सर्वच हॉटेलमध्ये पदार्थ बनविण्यासाठी कूक असले तरी पोळ्या व भाकरी बनविण्यासाठी महिला काम करतात. काही ठिकाणी घरी पोळी व भाकरी बनवून हॉटेलमध्ये पुरविण्यात येतात. या माध्यमातून महिलांना उदरनिर्वाह भागविण्याइतपत जेमतेम रोजगार मिळतो. मात्र आता हॉटेल बंद राहणार असल्याने उदरनिर्वाह कसा भागवायचा असा प्रश्न या महिलांसमोर निर्माण झाला आहे.
.........चौकट.............
जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्या : ३०० ते ३५०
हॉटेलमध्ये पोळी, भाजी बनविणाऱ्या महिलांची संख्या : ७०० ते ८५०
..........चौकट.............
भाजीपाला व्यवसायाचा घेतला आधार
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्व क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. यापूर्वी देखील लॉकडाऊन कालावधीत हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. यामुळे हॉटेलमध्ये पोळी, भाजी, भाकरी बनविणाऱ्या महिलांनी रोजगाराचे पर्यायी साधन शोधले होते. बहुतांश महिलांनी भाजीपाला व्यवसायाचा आधार घेऊन हॉटेल सुरू होईपर्यंत आपला उदरनिर्वाह भागविल्याचे दिसून आले. काही महिलांनी ग्रामीण भागात जाऊन शेतमजुरी केल्याचे पाहायला मिळाले.
............प्रतिक्रिया............
गेल्या वर्षी मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आले. यामुळे हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने आमच्यावर प्रचंड संकट कोसळले होते. यातून मार्ग काढत अन्य व्यवसाय शोधून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना चांगलीच दमछाक झाली.
-मंगला कसबे, महिला कामगार.
..............प्रतिक्रिया................
लॉकडाऊन कालावधीत आम्ही काढलेल्या दिवसांची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. कारण अचानक रोजगार बंद होणे अनपेक्षित होते. मात्र चरितार्थ चालविण्यासाठी जवळपासच्या गावातील शेतांमध्ये मजुरी करून उदरनिर्वाह भागविला.
-जनाबाई घोलप, महिला कामगार.
...........प्रतिक्रिया...............
घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने हॉटेलमध्ये पोळ्या करून कुटुंबाला हातभार लावते. मात्र आता महिनाभर हॉटेल बंद राहणार आहेत. यामुळे मागील वेळेप्रमाणे आतादेखील भाजीपाला व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही.
- शारदा भटकर, महिला कामगार.
.......................................