गॅसच्या भडक्याने घराला आग; अख्ख घर जळून खाक, १० लाखांचे नुकसान
By दिनेश पठाडे | Published: April 23, 2024 06:58 PM2024-04-23T18:58:52+5:302024-04-23T18:59:55+5:30
साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील एका घराला गॅस शेगडीने भडका घेतल्याने आग लागली आणि पाहता पाहता अख्ख घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
बुलढाणा: साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील एका घराला गॅस शेगडीने भडका घेतल्याने आग लागली आणि पाहता पाहता अख्ख घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. ही घटना २३ एप्रिलला घडली. साखरखेर्डा येथील नंदकिशोर लक्ष्मण देव हे बुलढाणा अर्बन शाखा, किनगावजट्टू येथे वॉचमन म्हणून काम करतात. त्यांची पत्नी गॅस शेगडी पेटविण्यासाठी गेल्या असता अचानक शेगडीतून भडका उडाला. या भडक्याने घरातील कपड्याने पेट घेतला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नंदकिशोर देव आणि परिसरातील लोक धावले परंतु आगीने रौद्ररूप धारण करून माळदाची खांबही पेटला. टीव्हीचा स्फोट झाल्याने पुन्हा आग भडकतच राहिली.
शेजारच्या नागरिकांनी तत्काळ नळाचे पाणी सोडण्यासाठी सरपंच सुमन सुनील जगताप यांना सांगितले. बादली, हंडा पाण्याने भरून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही युवकांनी आग नियंत्रक यंत्र आणून आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने त्यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील साहित्य जळून खाक झाले. मंडलाधिकारी रघुनाथ सोळंके, तलाठी प्रशांत पोंधे, तलाठी संजय शिंगणे, ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यात किमान १० लाखांचे नुकसान झाले आहे.