पीएफआयशी संबंध असलेल्या संशयितांच्या घराची झाडाझडती
By भगवान वानखेडे | Published: October 4, 2022 06:20 PM2022-10-04T18:20:47+5:302022-10-04T18:21:36+5:30
मागील काही महिन्यांपासून पीएफआयशी संबंध असलेल्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे.
बुलढाणा - केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेशी संबंध असलेल्या बुलढाणा शहरातील संशयितांच्या घराची पाेलीस आणि महसूलच्या संयुक्त पथकाने ४ ऑक्टोबर रोजी झाडाझडती घेतली़.
मागील काही महिन्यांपासून पीएफआयशी संबंध असलेल्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. अशातच मागील आठवड्यात या संघटनेवर केंद्र शासनाने बंदी घातली. दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी शासनाकडून जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आदेशाने बुलढाणा शहरात विविध भागात राहणाऱ्या पीएफआयच्या ७ संशयित कार्यकर्त्यांच्या घरांची पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्तरीत्या झडती घेतली.
झडतीनंतर त्यांना पंचनामा अहवाल देण्यात आला. या पथकामध्ये ‘ आयबी ’ च्या कर्मचाऱ्यांचा ही समावेश होता. यावेळी बुलढाणा उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, एलसीबीचे एपीआय मनीष गावंडे, एपीआय नीलेश लोधी यांच्यासह इतर कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते.