वसतिगृहातील मुलींना विषबाधाप्रकरणी गृहपाल निलंबित; पोलिसांतही गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Published: September 25, 2023 07:00 PM2023-09-25T19:00:24+5:302023-09-25T19:16:25+5:30
श्वेता महालेंनी केली होती मागणी
चिखली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे व आर्थिक मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील ६ मुलींना २२ सप्टेंबरच्या रात्री जेवणतून विषबाधा झाली होती. आ. श्वेता महाले यांनी याप्रकरणी संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकांवर कठोर कारवाईची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यावरून समाजकल्याण विभागाने संबंधित वसतिगृह अधीक्षकांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश २५ सप्टेंबर रोजी दिले आहेत.
सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील ६ मुलींना २२ सप्टेंबर रोजी विषबाधा झाली होती. या घटनेबाबत विशेष तपासणी पथकामार्फत २३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता, या शासकीय वसतिगृहाच्या ठिकाणी मुलींना देण्यात येणाऱ्या भोजनाची प्रत अत्यंत निकृष्ट असल्याचे तसेच इतर सोई-सुविधांच्या बाबतीत गंभीर उणिवा आढळून आल्या, तसेच अधिनस्त कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रणाचा अभाव असल्याचे अहवालावरून निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल एस. एस. जोशी, कनिष्ठ लिपिक यांनी शासकीय कर्तव्य पार पाडताना हलगर्जीपणा व कसूर केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक नियम १९७९) नियम क्रमांक ३ (१) (एक) (दोन) (तिन) मधील नियमाचा भंग केलेला असल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ४ (१) (अ) या नियमांतर्गत कनिष्ठ लिपिक या पदाचे नियुक्ती प्राधिकारी व शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणून प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांनी कनिष्ठ लिपिक एस. एस. जोशी यांना शासकीय सेवेतून तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल
याप्रकरणी सीमा प्रकाश चव्हाण वय २३, रा. सावखेड नागरे, ता. देऊळगाव राजा हिने चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आरोपी वसतिगृहाच्या अधीक्षक स्मिता श्रीकांत जोशी वसतिगृहातील मुलींच्या जेवणात अळ्या व उंदरांच्या लेंड्या निघाल्यावरून मुलींना विषबाधा होऊ शकते हे माहीत असूनही जाणीवपूर्वक अन्न खायला दिले, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून कोणाला काही सांगितल्यास प्रवेश रद्द करण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीवरून आरोपी जोशींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.