महागाई आणखी किती रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:30+5:302021-02-09T04:37:30+5:30

बुलडाणा : गेल्या चार महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये २० रुपयांची वाढ झाली आहे तर घरगुती सिलिंडरही महागले आहे. ...

How much more will inflation cry? | महागाई आणखी किती रडवणार?

महागाई आणखी किती रडवणार?

Next

बुलडाणा : गेल्या चार महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये २० रुपयांची वाढ झाली आहे तर घरगुती सिलिंडरही महागले आहे. ही वाढती महागाई आणखी किती रडवणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर कमी-अधिक प्रमाणात वारंवार वाढत आहेत. दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलीटर ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. सध्या पेट्रोलचा दर ९४.२३ रुपये प्रतिलीटर व डिझेलचा दर प्रतिलीटर ८३.२२ रुपये झाले आहेत. गेल्या चार महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरामध्ये २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य दुचाकीस्वारांना आता दुचाकी चालवणे परवडणार नाही. अनेकांचे आठवड्याचे बजेट हुकले आहे. दर आठवड्याला १०० ते १५० रुपयांचे पेट्रोल टाकणाऱ्या दुचाकीस्वारांना आता २०० रुपयांचे पेट्रोलही पुरत नसल्याची खंत त्यांच्यामधून व्यक्त होत आहे. तर विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरमध्ये २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७१० ते ७५० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या चार महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरातही १०० रुपयांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महिन्याला लागणाऱ्या सिलिंडरचा खर्च आता वाढल्याने किचनचे बजेटही बिघडले आहे.

डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रीपवर वाहन देण्यासाठीचा खर्चही आता वाढला आहे. डिझेलच्या दरवाढीने प्रवासी वाहनही आता परवडत नाही. प्रवासी भाडे वाढवून द्यायला तयार नाहीत, तर दुसरीकडे डिझेलचे दर झपाट्याने वाढवले जात आहेत.

विष्णू देशमुख, वाहनचालक.

पेट्रोलच्या दरवाढीने दुचाकी चालवणे आता परवडत नाही. पूर्वी चार दिवसाला १०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये भागत होते. परंतु, आता १०० रुपयांचे पेट्रोल तीन दिवसही पुरत नाही. पेट्रोलच्या दरवाढीने दुचाकी चालवणे अवघड झाले आहे.

सुमेध रणीत, चालक.

सिलिंडरच्या दरात वारंवार वाढ होतच आहे. सिलिंडरचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सबसीडीच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे. सिलिंडरचे दर आटोक्यात ठेवण्याची गरज आहे.

दिशा पवार.

Web Title: How much more will inflation cry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.