महागाईत पेरणी कशी करावी, शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:38+5:302021-06-04T04:26:38+5:30
गतवर्षी सोयाबीनच्या शेंगा उभ्या झाडावर कोम फुटले होते. खरीप हंगामात थोडेफार आलेले पीक कोरोना महामारी व शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे ...
गतवर्षी सोयाबीनच्या शेंगा उभ्या झाडावर कोम फुटले होते. खरीप हंगामात थोडेफार आलेले पीक कोरोना महामारी व शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे मालाचे मार्केट बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना होता नव्हता माल बेभाव विकावा लागला. सोयाबीनचे भाव बियाण्याच्या एका बॅग मागे एक ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत. शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये पीक विमा काढला. पिकाचे मोठे नुकसान झाले; परंतु शेतकऱ्यांच्या पदरात एक रुपयासुद्धा मिळाला नाही. विमा कंपन्यांचा मात्र यामध्ये चांगलाच फायदा झाला. शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्जसुद्धा परत करता आले नाही. आता बँकासुद्धा शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. पेरणी करण्याकरिता पैसा कुठून उपलब्ध होईल, पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, शासनाने महामंडळाचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहेत.
पीक विम्याचीही प्रतीक्षा
सिंदखेड राजा तालुक्यामध्ये १०१८ पासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे पीक विमा भरावा की नाही, अशी उदासीनता शेतकऱ्यांच्या मनामध्ये विमा कंपन्यांबद्दल झाली आहे. सध्या महागाई आकाशाला पोहोचली असून, बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही. पीक विम्याची रक्कम न दिल्यामुळे व दोन वर्षांपासून सतत कोरडा आणि ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.