नृसिंह जन्मोत्सवाला शेकडो वर्षांंची परंपरा !
By admin | Published: May 9, 2017 02:38 AM2017-05-09T02:38:46+5:302017-05-09T02:38:46+5:30
आज नृसिंह जयंती : मेहकरच्या मूर्तीचा स्कंद पुराणात उल्लेख !
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : भगवान विष्णूने घेतलेल्या दहा अवतारांपैकी नृसिंह हा चवथा अवतार समजला जातो. राज्यभर नृसिंह मंदिर बोटावर मोजण्याइतकी आहेत; बुलडाणा जिल्ह्यात चार नृसिंह मंदिरे असून शेकडो वर्षापासून या मंदिरांमध्ये जन्मोत्सवाची परंपरा जपली जाते.
बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, जानोरी, उमरद व मेहकर येथे ही नृसिंह मंदिरे आहेत. मेहकर येथील प्राचीन नृसिंहमुर्तीचा उल्लेख स्कंद पुराणात व गीता महात्म्यात आहे. मेहकरच्या नृसिंह मंदिरातील नवरात्रोत्सवाचे हे ४३६ वे वर्ष आहे. पितळे घराण्याच्या मूळपुरुषाला येथील माळीपेठेतील एका भुयारात ही प्राचीन नृसिंह मूर्ती मिळाली होती. तेव्हापासून सलग बारा पिढय़ांद्वारे पितळे घराण्यात नृसिंहाची उपासना सुरु आहे. प्राचीन नृसिंह मंदिरामध्ये नवरात्रोत्सव दरवर्षी विशिष्ट पारंपारिक पद्धतीने साजरा होतो. उत्सवामध्ये भजन-पूजन आदी उपक्रम साजरे होतात. नृसिंह मंदिरामध्ये मुख्य आकर्षण असते नृसिंह जयंतीच्या दिवशी श्रीमूर्तीला केल्या जाणार्या पोषाखाचे! हा पोषाख देणार्याला गुह्य पद्धतीची पारंपरिक साधना व विशिष्ट अनुष्ठान करावे लागते. अनेक वर्षापासून ही धुरा संत बाळाभाऊ महाराजांच्या गुरुपीठाचे उत्तराधिकारी अँड. रंगनाथ महाराज पितळे हे सांभाळत आहेत.
नृसिंहाच्या उग्ररुपाचे घडते दर्शन !
नृसिंहजन्मावेळी मेहकर शहरातील प्राचीन नृसिंह मंदिरामध्ये नाट्यमयरित्या पडदा उघडून सजविलेल्या नृसिंहाच्या उग्ररुपाचे दर्शन घडते, तेव्हा भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडते.