डिग्रसच्या घाटातून शेकडाे ब्रास रेतीचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:31 AM2021-03-07T04:31:34+5:302021-03-07T04:31:34+5:30
बाजीराव वाघ दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्याची सीमालगत आणि देऊळगाव राजा तालुक्यात येत असलेल्या डिग्रस येथील ...
बाजीराव वाघ दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्याची सीमालगत आणि देऊळगाव राजा तालुक्यात येत असलेल्या डिग्रस येथील रेती घाटातून दरराेज शेकडाे ब्रास रेतीचे उत्खनन हाेत आहे. या रेतीची दिवसभर वाहतूक हाेत असताना महसूल विभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे, शासनाचा लाखाे रुपयांचा महसूल बुडत आहे.
डिग्रस येथील पूर्णा नदीच्या पात्रातील रेती घाटावर जाण्यासाठी तस्करांनी अनेक चोरटे रस्ते बनविलेले आहेत. देऊळगाव मही ते मलकापूर पांग्रा रस्त्यावर देऊळगाव महीपासून थाेड्या अंतरावर आडवळणी डिग्रस हे गाव आहे. गावात जवळपास ४० ते ५० अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर गाड्या आहेत. येथील रेती घाटाचा लिलाव न झाल्याने या पॉइंटवर महसूल विभागाने एक तलाठी, दोन कोतवाल ऑन ड्युटी तैनात ठेवले आहेत. संध्याकाळी ६ वाजता त्यांची ड्युटी संपली की रेती तस्करीला सुरुवात हाेते. रात्री ७ ते ८ वाजताच्या दरम्यान रेती घाटावर स्टॉक केलेली रेती टिप्परमध्ये जेसीबीच्या साह्याने भरल्या जाते. त्यानंतर रेतीच्या गाड्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. त्यानंतर ९ वाजताच्या दरम्यान रेती तस्कर नदी पात्रात किनी असलेले ट्रॅक्टर लावून सकाळी ३ वाजेपर्यंत रेती पाण्यातून उपसून बाहेर काढून नदी काठावर त्याचा पुन्हा साठा केल्या जातो. त्यानंतर सकाळच्या चार वाजतादरम्यान रेती जेसीबीद्वारे टिप्परमध्ये भरून पुन्हा त्या गाड्या रेती विक्रीसाठी पाठविली जातात. या रेती तस्करांकडे स्वतःच्या गाड्या आणि त्या भरण्यासाठी स्वतःच्या जेसीबी मशीन तसेच रेती बाहेर काढण्यासाठी किनी असलेले ट्रॅक्टर स्वतःचेच आहेत. रेतीची वाहतूक करताना महसूलच्या अधिकाऱ्यांचे लाेकेशन घेतले जाते.
रेतीचा करून ठेवतात साठा
वाळू माफिया रेतीचा साठा शासकीय जमिनीवर करून ठेवतात त्यामुळे जर एखाद्या वेळी महसूल विभागाने अवैध साठा केलेली रेती पकडली तर तिचा मालक कोण आहे, याचा शाेध लागत नाही. त्यामुळे कुणावर गुन्हा दाखल होत नाही. पर्यायाने महसूल विभाग त्या साठवलेल्या रेतीचा लिलाव करतात. त्यामुळे सदर रेती तस्कर त्या लिलाव केलेल्या रेतीची हरासी घेऊन त्या पावतीवर पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी करतात. या नदीवर रेती तस्करीसाठी २ ते ३ पॉइंट आहे. त्यामुळे महसूल विभागाने कितीही पकडण्याचे प्रयत्न केले तरी हे तस्कर जाळ्यात येत नाहीत.