नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना

By अनिल गवई | Published: June 26, 2023 02:40 PM2023-06-26T14:40:51+5:302023-06-26T14:42:27+5:30

श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने रवाना झालेल्या भाविकांचे खामगावात मनोभावे स्वागत करण्यात आले.

hundreds of devotees left for pandharpur on the occasion of ashadhi ekadashi from khamgaon | नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना

नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना

googlenewsNext

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव :आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी दुपारी खामगाव येथून हजारो भाविक पंढरपूरसाठी रवाना झाले. भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज खामगाव रेल्वे स्थानकातून सोडण्यात आली. या फेरीला खामगाव आणि परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने रवाना झालेल्या भाविकांचे खामगावात मनोभावे स्वागत करण्यात आले.

या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला खासदार प्रतापराव जाधव, खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अलकादेवी सानंदा, कृउबास सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह स्टेशन प्रबंधक संतोष अनासने, उप स्टेशन प्रबंधक योगेश भांबेरे यांनी हिरवी झेंडी दिली. यावेळी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने लोको पायलट एस. एस. काकडे, गार्ड पी. के. कोळी यांचा तसेच विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वेचे परिवहन निरीक्षक मोहन देशपांडे, यामिन अन्सारी, एस. पी. वरूडकर, आरपीएफ रणवीरसिंह, आर. जे. श्रीवास्तव, डीवायएसएस एल.डी. वाघ, मनोज नगराळे, प्रशांत तायडे, प्रियंका कांबळे, संजय कायंदे, एएसआय प्रवीण भरणे यांच्यासह भाजप, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हरिनामाचा गजर, पावसाच्या सरींनी वारकऱ्यांचे स्वागत

विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रवाना होण्यापूर्वी वारकरी आणि उपस्थितांनी हरिनामाचा एकच गजर केला. यावेळी पावसाच्या सरीही बरसल्या. पावसाच्या सरींनी वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. बरेच दिवस लांबलेला पाऊस विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रवाना होतानाच बरसला. त्यामुळे वारकरी आणि राजकीय पुढाऱ्यांनी पावसात भिजत हरिनामाचा जयघोष केला.

६१२ प्रवासी, रेल्वेला दोन लाखांचे उत्पन्न

पहिल्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने सोमवारी ६१२ प्रवासी पंढरपूरसाठी रवाना झाले. यामध्ये सामान्य श्रेणीतून ४२१, स्लीपर कोचमधून १७०, थ्री टीएर एसी श्रेणीतून २२ प्रवाशांनी प्रवास केला. या माध्यमातून रेल्वेला दोन लक्ष ०४ हजार १९० रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Web Title: hundreds of devotees left for pandharpur on the occasion of ashadhi ekadashi from khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.