दीड हजार घरकुलांच्या वाटपाचा तिढा सुटणार!

By admin | Published: May 18, 2017 12:02 AM2017-05-18T00:02:21+5:302017-05-18T00:02:21+5:30

नवीन लाभार्थी यादीच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे म्हाडास पत्र

Hundreds of thousands of homes will be distributed! | दीड हजार घरकुलांच्या वाटपाचा तिढा सुटणार!

दीड हजार घरकुलांच्या वाटपाचा तिढा सुटणार!

Next

अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरात निर्माण करण्यात आलेल्या घरकुलांच्या नवीन प्रतीक्षा यादीस मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘म्हाडा’शी पत्रव्यवहार केला असून, एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत निर्मित या घरकुलांचे वाटप पात्र लाभार्थींना केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील १४३० घरकुलांना आता हक्काचे मालक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसून येते.
शहरातील नागरिकांना घरकुलाची सुविधा देण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-१ अंतर्गत १४३० घरकुलांचे निर्माण करण्यात आले. या घरकुलांची निर्मिती करण्यापूर्वी शहरात विशेष सर्वेक्षण करून योजनेला सन २००७-०८ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सन २०१० मध्ये सुमारे २७ कोटी रुपयांच्या खर्चातून घरकुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र, या घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर घरकुलांचा ताबा घेण्यासाठी संबंधित लाभार्थींनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे सुमारे २७ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या १४३० घरकुलांपैकी बहुतांश घरकुलं ओस पडली होती, तर काही घरकुलांमध्ये अतिक्रमण झाले होते. अशा परिस्थितीत घरकुल वाटपाचा कायदेशीर पेच निर्माण झाल्याने, पालिका प्रशासनाकडून या घरकुलांच्या वाटपासाठी फेर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार तयार करण्यात आलेली सुधारित लाभार्थी यादीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. तसेच यासंबंधी संपूर्ण वस्तुस्थिती पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रस्तावाबाबत उपअभियंता म्हाडा, उपविभाग अकोला तथा सदस्य सचिव, जिल्हा गृहनिर्माण अधिकारी अकोला यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

नवीन यादीत १२९२ लाभार्थी!
शहरात १४३० घरकुलांच्या निर्मितीनंतर केवळ १३८ लाभार्थींनी या घरकुलांचा ताबा घेतला. दरम्यान, उर्वरित १२९२ लाभार्थींनी घरकुलाचा लाभ घेण्यास नकार दिला. घरकुलाचा ताबा नाकारणाऱ्या लाभार्थींनी, पक्के घर बांधले, स्थानांतरण केले, राहते घर सोडून जाण्याची इच्छा नाही, या योजनेचा लाभ नको, वैयक्तिक कारणांमुळे, अशी पाच कारणे लेखी दिली. त्यानंतर पालिका प्रशासनाने १२९२ जणांची सुधारित लाभार्थी यादीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या घरकुल वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. लाभार्थींनी नकार दिल्यानंतर फेर सर्वेक्षण करण्यात आले. या फेर सर्वेक्षणानुसार विस्तृत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर हिरवी झेंडी मिळाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.

शहरात निर्मित घरकुलांचा विनियोग करण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. पालिका प्रशासनासोबतच जिल्हा स्तरावरूनदेखील घरकुल वाटपाचा तिढा सोडविण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाचे आहेत.
-एम.एम. महीतकर, वरिष्ठ लिपिक, नगर परिषद, खामगाव.

Web Title: Hundreds of thousands of homes will be distributed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.