भुकेल्याची भूक, तहानलेल्याची तहान जाणावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:07+5:302021-09-27T04:38:07+5:30
बुलडाणा: भुकेल्याची भूक, तहानलेल्याची तहान जाणावी, या अभंगाचे प्रत्यक्ष दर्शन येते ते जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रासमोर. सध्या दिवसाला जिल्ह्यातील साडेतीन ...
बुलडाणा: भुकेल्याची भूक, तहानलेल्याची तहान जाणावी, या अभंगाचे प्रत्यक्ष दर्शन येते ते जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रासमोर. सध्या दिवसाला जिल्ह्यातील साडेतीन हजार जणांची शिवभोजनाने तृप्ती होत आहे. यातील काही कुटूंब दररोजची भूक शिवभोजन थाळीवरच भागवत आहेत.राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. शिवभोजन थाळीची सुरुवातीची किंमत १० रुपये ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोना काळात पाच रुपयांना शिवभोजन देण्यात आले. तर आता गत एप्रिल २०२१ पासून शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच शिवभाेजन केंद्रावर थाळ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. दिवसाला साडेतीन हजार थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गोरगरीबांची भूक भागविली जात आहे.
तासाभरात संपते थाळी
जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रात दोन पोळी, भात वरण आणि एक भाजी दिल्या जाते. कोरोना काळात शिवभोजन केंद्रावर अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, सध्या ठराविक काही कुटूंबांचे दररोजचे जेवणच शिवभोजन थाळीवर भागत आहे. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या शिवभोजन थाळीचे मोफत वितरण अवघ्या काही तासातच संपूण जाते.
गोरगरीबांना झाला आधार
कोरोना काळात अनेक गोरगरीबांना शिवभोजन थाळींचा चांगला आधार झाला. सध्या जिल्हाभरातील सर्वच केंद्रामध्ये शिवभोजनाला प्रतिसाद मिळत आहे. गत सहा महिन्यात चार लाखांपेक्षाअधिक जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. थाळ्यांची संख्या दीडपटीने वाढविली आहे.
गणेश बेल्लाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.
४९००००
शिवभोजन थाळ्यांचे सहा महिन्यात वितरण
२१
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन केंद्र
शिवभोजनाने उपाशी झोपू दिले नाही...
कोरोना काळात काम गेले. दोन वेळच्या जेवणाची आबाळ झाली होती. परंतू शिवभोजन थाळीने उपाशी झोपू दिले नाही. शिवभोजन आहे, म्हणून बरे आहे, नाहीत, कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली असती, अशी प्रतिक्रिया बसस्थानकावरील एका व्यक्तीने दिली.
दिवसाला होणार थाळ्यांचे वितरण : ३६००
बुलडाणा: १२३८
मेहकर १८८
देऊळगाव राजा ४४६
मोताळा १५०
संग्रामपूर १८८
सिंदखेड राजा १८८
खामगाव १८८
शेगाव १५०
जळगाव जामोद १८८
चिखली १८८
लोणार १५०
मलकापूर १८८
नांदूरा १५०