दुसऱ्या दिवशीही पेनटाकळी प्रकल्पातील उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:40+5:302021-02-07T04:32:40+5:30
मेहकर तालुक्यात असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे हजारो हेक्टर सिंचन केले जाते. मात्र या कालव्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने कालवा ...
मेहकर तालुक्यात असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे हजारो हेक्टर सिंचन केले जाते. मात्र या कालव्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने कालवा पाझरून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाझरत असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती खराब होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटरपर्यंत पाईपलाईनने पाणी नेण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पेनटाकळी प्रकल्पात उपोषणाला बसले आहेत. शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट दिली. या शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी जाणून घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार यांनी जलसंधारण मंत्री यांना भ्रमणध्वनीद्वारे परिस्थितीची माहिती दिली. यासोबतच सर्व परिस्थितीचा अहवाल तयार करून स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.
शेतकरी आक्रमक
या कालव्यातून पाणी पाझरून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याकरता वेळोवेळी शेतकऱ्यांनी आंदोलने, उपोषणे केली. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याकरिता शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.