रुग्णालयात पत्नीचा मृतदेह टाकून पती फरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:50 AM2017-08-05T00:50:34+5:302017-08-05T00:55:29+5:30

Husband absconded by the body of his wife! | रुग्णालयात पत्नीचा मृतदेह टाकून पती फरार!

रुग्णालयात पत्नीचा मृतदेह टाकून पती फरार!

googlenewsNext
ठळक मुद्दे विवाहितेचा घातपात केल्याचा आई-वडिलांचा आरोपघटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस मृतक विवाहितेच्या माता-पित्याने पतीसह इतर मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथील सामान्य रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास विवाहितेचा मृतदेह टाकून पती फरार झाल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी माझ्या मुलीचा सासरच्या मंडळींनी घात केला, असा विलाप करीत मृतक विवाहितेच्या माता-पित्याने पतीसह इतर मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत तज्ज्ञांकडून पोस्टमार्टम करून घेण्याचा दबाव वाढल्यानंतर विवाहितेचा मृतदेह अकोला सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.
जाफ्राबाद पोलीस स्टेशनांतर्गत माहोरा गावचे सासर असलेली विवाहिता जयश्री प्रकाश शिरसाट (वय २२) हिचे माहेर शिरपूर आहे. मागील चार वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. पतिकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची तक्रार यापूर्वीही तिने आई-वडिलांकडे केली होती. त्यानंतर वकील  आणि इतर मध्यस्थांकडून समझोता होऊन तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले होते. तरीही तिला भेटू न देणे, तिच्याशी बोलू न देणे, तिला मारहाण करणे, असे प्रकार नेहमी होत असल्याचा आरोप मृतक विवाहितेचे वडील मदन वामन हिवाळे यांनी केला आहे.   दुसरीकडे विवाहितेचा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचे सासरची मंडळी रुग्णालयात नोंद करताना सांगून गेली. कुणी साप चावल्याचे म्हटले, तर कुणी विंचू चावल्याचे, तर तिच्या पतीने संडास- उलटीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. अशा वेगवेगळ्या विधानांमुळे विवाहितेचा मृत्यू नेमका कशाने झाला हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच कळणार आहे. दरम्यान, शिरपूरमधून शेकडोंच्या संख्येने महिला-पुरुष गावकर्‍यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. सदर प्रकरणाची चौकशी व्हावी आणि पोस्टमार्टम अकोला येथेच करण्यात यावे, अशा दोन मागण्या गावकर्‍यांनी केल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी अकोला जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून मृतदेह अकोला येथे रवाना केला. शिवसेना नेते संजय गायकवाड, समाजसेवक अशोक गव्हाणे, उपाध्यक्ष विजय जायभाये यांनीही विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. घटनास्थळ जाफ्राबाद (जि.जालना) असूनही एसडीपीओ महामुनी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांनीही विशेष लक्ष घालत जाफ्राबाद पोलिसांसोबत आपला एक पोलीस अकोला येथे पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. तत्पूर्वी कित्येक तास मृतदेह तसाच पडून होता. शोकांतिका म्हणजे पोस्टमार्टम करून घेण्याची जबाबदारी कुणाची, यावर मात्र जाफ्राबाद पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांमध्ये कायद्याचा किस पाडला जात होता. जाफ्राबादहून साहने आणि सरडे नावाचे दोन पोलीस कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर पुढची कार्यवाही होऊ शकली. 

Web Title: Husband absconded by the body of his wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.