प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:19 AM2017-07-19T00:19:56+5:302017-07-19T00:19:56+5:30
मृताची पत्नी, प्रियकरास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव राजा : येथील राजेंद्र तेलंग यांचा अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. ही घटना १६ जुलै रोजी घडली. या प्रकरणात मृताची पत्नी व तिच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे.
मृत राजेंद्र काशिराम तेलंग हे त्यांची पत्नी शालु, दोन मुली व एक मुलगा यांच्यासह त्यांच्या पिंपळगाव राजा येथील घाणेगाव रस्त्यालगतच्या स्वत:च्या शेतातील घरात राहत होते. १६ जुलै रोजी मृत राजेंद्र तेलंग हे दुपारी ३.३० वाजता कामावरून घरी आले, तेव्हा त्यांची पत्नी शालु व तिचा प्रियकर मोहम्मद शहाबाज अब्दुल वाहाब या दोघांना नको त्या स्थितीत त्यांनी रंगेहात पकडले व त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. आपले अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून शालू हिने नवऱ्याला घरात ढकलले व घराच्या दाराची कडी बाहेरुन बंद केली. तेव्हा तिचा प्रियकर मो.शहाबाज याने घरात राजेंद्र तेलंग यांना जबर मारहाण करून त्यांचा गळा घोटून खून केला व तेथून निघून गेला. यानंतर मृत राजेंद्र तेलंग यांची पत्नी शालु तेलंग हिने घरातील सर्व सामान व्यवस्थित केले व आपल्या पतीला खाटेवर टाकून आरडाओरड केली. पती राजेंद्र तेलंग हे कामावरून घरी आले व झोपले. ते काहीच बोलत नाहीत, अशी माहिती तिच्या मदतीला आलेल्या लोकांना सांगितली. तेव्हा राजेंद्र तेलंग यांना रुग्णालयात लोकांनी नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले; परंतु मृत राजेंद्र तेलंग हे शेतकरी आहेत, त्यांनी आत्महत्या केली असावी म्हणून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली व त्यांच्या नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालामध्ये राजेंद्र तेलंग यांचा मृत्यू जबर मारहाण व गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन पो.स्टे. ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी तपासाची चके्र फिरविली व मृत राजेंद्र तेलंग यांच्या मुलांकडे चौकशी केली तेव्हा मृताच्या १५ वर्षीय मुलीने घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली व राजेंद्र तेलंग यांच्या खुनाला वाचा फुटली. या घटनेची फिर्याद मृताचा मोठा भाऊ अनिल तेलंग यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहाबाज अब्दूल वाहाब वय ३० वर्षे याला अटक करून बोलते केले, तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तर त्याला सहकार्य करणारी मृताची पत्नी शालु तेलंग हिच्यासह दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ३ (२)(५) तसेच खुनाच्या गुन्ह्यात कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. १८ जुलै रोजी आरोपी मोहम्मद शहाबाज अ.वाहाब व शालुबाई तेलंग यांना खामगाव न्यायालयात हजर केले असता, दोन्ही आरोपींना २१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले.