मंगळसूत्र विकून जपला पतीचा स्वाभिमान!

By admin | Published: July 13, 2017 12:37 AM2017-07-13T00:37:47+5:302017-07-13T00:37:47+5:30

हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पार्वताबार्इंनी उभारले शौचालय

Husband's husband by selling the Mangalsutra! | मंगळसूत्र विकून जपला पतीचा स्वाभिमान!

मंगळसूत्र विकून जपला पतीचा स्वाभिमान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : हगणदरीमुक्त शहराचा ध्यास घेतलेल्या चिखली नगर परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर जाणाऱ्या पतीवर केलेली कारवाई जिव्हारी लागल्याने दागिन्यांपेक्षा कुंकवाच्या धन्याच्या स्वाभिमानाला प्राधान्य देत येथील पार्वताबाई सोनारे यांनी सौभ्याग्याचे लेणे मंगळसूत्र विकून शौचालय उभारले आहे. आजवर पत्नीसाठी शौचालय बांधणारे पतीराज अनेक ठिकाणी पहावयास मिळतात; मात्र पतीच्या स्वाभिमानासाठी हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शौचालय बांधणारी पार्वताबाई कदाचित पहिलीच महिला ठरावी.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत चिखली नगर परिषदेने हगणदरीमुक्त शहराचा ध्यास घेतला आहे. याअंतर्गत शहरात शौचालये नसलेल्या कुटुंबांनी शौचालये उभारावीत, यासाठी व्यापक जागृती केल्यानंतर गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर जाणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याच अंतर्गत गुड मॉर्निंग पथकाने संत रोहिदासनगरमधील शंकर अमरसिंग सोनारे यांच्यावर कारवाई केली होती. ही बाब त्यांची पत्नी पार्वताबाई सोनारे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. सोबतच संपूर्ण कुटुंबाची शौचालयाअभावी होणारी कुचंबणा आणि पतीराजांचा स्वाभिमानापुढे हलाखीची परिस्थिती असतानाही त्यावर मात करून स्वत:चे मंगळसूत्र विकून पार्वताबार्इंनी स्वत:च्या घरी शौचालये उभारले असून, आजरोजी या शौचालयाचा नियमित वापरदेखील चालविला आहे.
पार्वताबार्इंनी शौचालय उभारणीसाठी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेत नगर परिषदेचे कर्तव्यकठोर मुख्याधिकारी वसंतराव इंगोले यांनी पालिकेच्यावतीने स्वच्छ महाराष्ट्र योजनेंतर्गत १७ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करून पार्वताबार्इंना दिलासा दिला आहे. या मदतीचा धनादेश १२ जुलै रोजी पालिकेत नगरसेविका विमल देव्हडे यांच्या हस्ते पार्वताबाई सोनारे यांना प्रदान करण्यात आला.
तसेच पालिकेच्यावतीने पार्वताबार्इंचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी न.प. उपाध्यक्ष वजीराबी शे.अनिस, मुख्याधिकारी इंगोले, महिला व बालकल्याण सभापती अर्चना खबुतरे, नगरसेवक पंडितराव देशमुख, अ.रऊफ अ.मजीद, गोपाल देव्हडे, गोविंद देव्हडे, नामू गुरूदासाणी, शे.रफीक, रामदास देव्हडे, कुणाल बोंद्रे, सुभाषआप्पा झगडे, बंडू कुळकर्णी, शे.अनिस, संजय अतार यांची उपस्थिती होती. संचालन करून आभार कार्यालय पर्यवेक्षक अर्जुनराव इंगळे यांनी मानले.

Web Title: Husband's husband by selling the Mangalsutra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.