प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:47 PM2020-02-01T12:47:47+5:302020-02-01T12:48:01+5:30
संगिताचे आतेभाऊ सुनिल दुंडियार (मु. पो. पिंपळगाव लेंडी ता. सिंदखेड राजा, ह. मु. औरंगाबाद ) याच्यासोबत अनैतिक संबंध होते.
बुलडाणा : पतीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नी व तिच्या प्रियकराला शुक्रवारी जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संगीता संजय देव्हरे व सुनील दुंडियार अशी आरोपींची नावे आहेत.
चिखली येथील संभाजी नगरमध्ये संजय शंकर देव्हरे (वय २९) पत्नी संगितासोबत भाड्याने खोली करुन राहत होते. संगिताचे आतेभाऊ सुनिल दुंडियार (मु. पो. पिंपळगाव लेंडी ता. सिंदखेड राजा, ह. मु. औरंगाबाद ) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान १६ जानेवारी २०१८ रोजी सुनिल दुंडियार प्रियसीच्या भेटीसाठी चिखली येथे आला होता. त्याने संजय देव्हरे याला झोपेच्या गोळ्या टाकून मद्य पाजले. त्यानंतर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास संगिताच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगिताने सासरे शंकर देव्हरे यांना फोन करुन पती हातपाय खोरत असल्याचे सांगितले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता संजय फरशीवर पडलेला दिसला.
चिखली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. कुटूंबियांना याप्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी संगिताला विश्वासात घेवून विचारणा केली असता तिने खरी हकीकत त्यांना सांगितली. त्यानुसार मृताचे वडील शंकर देव्हरे यांनी १७ जानेवारी २०१८ रोजी चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुनील दुंडियार व संगिता देव्हरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास अधिकाऱ्यांनी तपास करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी शंकर देव्हरे, मृताचा आई मंगला देव्हरे, काका सुरेश देव्हरे, रामेश्वर देव्हरे, घटनास्थळावरील पंच, वैद्यकिय अधिकारी, खोली मालक किरण मोरे, शुभम जाधव, व्हिडीओग्राफर बेलोकार, नोडल आॅफिसर व तपास अधिकारी सुधाकर गवारगुरु यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल वसंत भटकर यांनी भक्कमपणे बाजू मांडली. पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात कौर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार यांनी काम पाहिले.