भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवीन - सावजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:12 AM2017-07-21T01:12:25+5:302017-07-21T01:12:25+5:30
शेगाव : पाणीपुरवठ्याच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांना धडा शिकवीन, असे रोखठोक प्रतिपादन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले.
शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचाऱ्यांवर अपहार रकमेच्या वसुलीची कार्यवाही करावी, अन्यथा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांना धडा शिकवीन, असे रोखठोक प्रतिपादन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले.
स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत सावजी यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन केली असून, त्या माध्यमातून आंदोलने केली जातील, असे भ्रष्टाचाराचे विविध दाखले देत केलेले प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखवून बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना केल्याची माहिती दिली. बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा निर्मूलन समितीमार्फत कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. बुलडाणा, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बुलडाणा यांना १३ मुद्यांचे १४२० गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विविध समस्यांचे निवेदन देऊन त्यावर १५ आॅगस्टपर्यंत झालेला भ्रष्टाचार उघड न झाल्यास १५ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट दरम्यान ब्रँडेड कंपनीच्या पण जुन्या व फाटक्या चपला व जोडे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता जि.प. बुलडाणा, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बुलडाणा यांना देण्यात येतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीत उपाध्यक्ष वा.रा.पिसे, प्रमोद पाटील चिखली, अंबादास पाटील खामगाव, सचिव अमित जाधव शेगाव, सदस्यपदी सुनिता भांड लोणार, सुनिल कोल्हे मोताळा, संजय तारापुरे शेगाव, गणेश जुनघरे, रमेश घोलप, रवि पाटील, गणेशराजे जाधव आदींचा समावेश आहे.
या समितीच्या माध्यमातूनच पाणी पुरवठयाच्या योजनांबाबत लढा देण्यात येईल असेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी शैलेष सावजी, देवलाल पाटील, लक्ष्मण दांदळे, संतोष टाकळकर, लताबाई घाईत, गजेंद्र धनोकार, प्रकाश भोजने, रहीमखा शे अमीन आदींची उपस्थिती होती.