बुलडाण्याच्या लॅबला 'आयसीएमआर'ची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:41 AM2020-09-23T11:41:47+5:302020-09-23T11:42:03+5:30
तपासणीचे तांत्रिक कौशल्य बुलडाणा लॅबने अवगत केल्याने बुलडाणा लॅब कार्यान्वीत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अडीच महिन्यापासून बुलडाण्यातील आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत होण्याची प्रतीक्षा आता संपली असून आयसीएमआरनेही परीक्षणानंतर बुलडाण्याच्या लॅबला मान्यता दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, नागपूर येथील दोन कोरोना संदिग्धांच्या नमुन्यांची तपासणीही बुलडाण्याच्या लॅबमध्ये करण्यात आली आहे.
या तपासणीनंतर कोरोना संदर्भातील अहवाल तपासणीचे तांत्रिक कौशल्य बुलडाणा लॅबने अवगत केल्याने बुलडाणा लॅब कार्यान्वीत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यावर एक प्रकारे शिक्का मोर्तब झाले आहे. प्रारंभी बुलडाण्याच्या लॅबमध्ये अवघे ८० नमुने तपासल्या जातील. जसजसा लॅबचा आवाका वाढत झाली तसतशी ही क्षमता वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० ते १५० नमुने तपासण्यात येणार आहे. नंतर एकाच वेळी जवळपास ९६ नमुने तपासण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यानंतर बुलडाण्याची लॅब पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत होईल, असे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे बुलडाण्याच्या लॅबमध्ये कोरोना नमुन्यांच्या तपासणीसाठी जवळपास दीड कोटी रुपयांचे रसायन लागण्याची शक्यता असून त्याची पुर्तता झाल्यानंतर बुलडाण्याची लॅब प्रत्यक्षात कार्यान्वीत होईल. ते झाल्यानंतर प्रसंगी अधिकृतस्तरावर बुलडाण्याची लॅब कार्यान्वीत झाल्याची घोषणा केली जाईल, असे सुत्रांनी सांगितले.