ओळखीची साक्ष देणाऱ्यास केले जमानतदार, चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
By अनिल गवई | Published: August 10, 2024 04:29 PM2024-08-10T16:29:07+5:302024-08-10T16:29:25+5:30
याप्रकरणी तक्रारीनंतर चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह चौघांविरोधात खामगाव शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव : परिचित व्यक्तीसाठी ओळखीची साक्ष देण्यास बँकेत गेलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या खोट्या स्वाक्षरी करून त्याला जमानतदार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारीनंतर चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह चौघांविरोधात खामगाव शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, खामगाव शहरातील सतीफैलातील रहिवासी असलेले आणि सद्य:स्थितीत तालुक्यातील शेलूद येथे वास्तव्यास असलेल्या राजेश साहेबराव जाधव (४५) यांना कल्पना अजय खाकरे (४०) व अजय बाबूराव खाकरे (४८, दोघेही रा. बोबडे कॉलनी, खामगाव) यांनी ओळख देण्यासाठी चिखली अर्बन बँकेत नेले. तेथे उपस्थित असलेल्यांनी छापील अर्जावर दोघांनाही ओळखत असल्याचे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेतली. या बाबीचा संबंधितांनी व्यवसायासाठी चिखली अर्बन बँकेच्या खामगाव शाखेतून घेतलेल्या १ कोटी ८५ लाख रुपयांच्या कर्जाशी काहीही संबंध नसल्याची हमी दिली; मात्र या स्वाक्षरीचा दुरुपयोग करीत ओळखीची साक्ष देण्यास गेलेल्या जाधव यांच्या खोट्या स्वाक्षरी करून जमानतदार केले. त्यानंतर दोन्ही आरोपींच्या कर्जाचे पुनर्गठण केले.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कागदपत्रे हस्तगत करून फसगत झाल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले. दरम्यान, त्यानंतर कृष्णकुमार हरिनारायण पांडे (४८) आणि सतीश गुप्त (दोघेही रा. चिखली) यांनी आरोपींच्या तीन कंपनी आणि मालमत्तेचा लिलाव केल्याचे दाखवून नंतर लिलावाची रक्कम खात्यात जमा न करता, लिलाव रद्द झाल्याचे दाखवून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत केला. चारही आरोपींनी संगनमत करून तसेच खोटे दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याचे नमूद केले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चारही आरोपींविरोधात (तक्रार १ जुलैपूर्वीची असल्याने) भादंवि कलम ४२०, ४५१, ४७१, ४६७, ४७४, ४७८, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप नाचनकर करीत आहेत.