विवेकानंद जन्मोत्सवातून समाजाची वैचारिक जडणघडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:37+5:302021-02-06T05:05:37+5:30
हिवरा आश्रम : विवेकानंद जयंती महोत्सव हा समाजाची वैचारिक व आध्यात्मिक भूक लक्षात घेऊन सुरू केलेला प्रबोधनाचा जागर आहे. ...
हिवरा आश्रम : विवेकानंद जयंती महोत्सव हा समाजाची वैचारिक व आध्यात्मिक भूक लक्षात घेऊन सुरू केलेला प्रबोधनाचा जागर आहे. विवेकानंद आश्रमात तीन दिवस लावणाऱ्या या उत्सवातून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यानकार, कीर्तनकर, प्रबोधनकार यांचे वैचारिक मार्गदर्शन समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. विवेकानंद जन्मोत्सवातून समाजाची वैचारिक जडणघडण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले. विवेकानंद आश्रमात सुरू असलेल्या जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्यासपीठावरील ज्ञानयज्ञात आपल्या व्याख्यानातून ते श्रोत्यांसमोर बुधवारी ते बोलत होते.
पुढे बोलताना साहित्यिक कांबळे म्हणाले की, आई हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा, वात्सल्याचा व ममतेचा विषय असतो. आईचा महिमा अगाध, अवर्णनीय, अलौकिक व शब्दातीत आहे. जगात प्रत्येक व्यक्तीला आपली आई प्रिय असते. जगात आईची उदंड रूपे दिसून येतात. व्यवस्था कधी शस्त्राला घाबरत नाही. व्यवस्था शब्दांना घाबरत असते. शब्दांना बळ देण्याची ताकद आईच्या मायेत असते. संकटात, कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची शक्ती म्हणजे आई असते. आपण साने गुरुजी यांची आई वाचा. साने गुरुजींच्या आईने महाराष्ट्रातील चार पिढ्या घडविल्या. यावरून आई व आई शब्दात किती ताकद आहे याची तुम्हाला कल्पना येईल. शाळेत पहिला निबंध कोणता लिहिला असेल असेल तर तो आई आहे. आईवर लिहिणे खूप सोपे. आईवर लिहिणे खूप आनंददायी. उत्तम कांबळे यांनी आई समजून घेताना या व्याख्यानातून आई व आईच्या संघर्षाला शब्दाव्दारे प्रगट केले.