पुलाचे बांधकाम करुन अतिक्रमण न काढल्यास आंदोलन
By admin | Published: July 14, 2017 07:45 PM2017-07-14T19:45:31+5:302017-07-14T19:45:31+5:30
प्रहार संघटनेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बाणगंगा नदीवरील पुलाचे, राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु करण्यात यावे तसेच धाड येथील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेकरून येत्या सात दिवसांमध्ये उपरोक्त समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याबाबत कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नुमद आहे की, धाड येथील बाणगंगा नदीच्या पात्रावर सिमेंटचे मोठे-मोठे पाईप टाकून पुल बांधण्यात आलेला आहे. सदर पुल हा नागरी वस्तीसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून पाईपधून पाणी वाहून जात नसल्याने पुराचे पाणी गावात शिरत आहे. धाड हे गाव बुलडाणा ते औरंगाबाद जाणाऱ्या राज्यमहामार्गावर वसलेले असून या मार्गाचे महत्व व मोठ्या प्रमाणावरील वाहनांच्या ये-जामुळे या मार्गाला राष्ट्रीय महामागार्चा दर्जा देण्यात आला आहे. तसेच रस्ता बांधकामासाठी करोडो रुपयांचा निधीदेखील देण्यात आला आहे. मात्र सदर रस्त्याच्या बांधकामास अद्यापपर्यंत सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे अरुंद असलेल्या या मार्गावर रस्ता अपघातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तसेच मौलाना आझाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल निराळा व बुलडाणा अर्बन बँक दरम्यान अनेक व्यावसायीकांनी आपले दुकाने थेट रस्त्यापर्यंत थाटली आहेत. आधिच अरुंद असलेल्या रस्त्यापर्यंत अतिक्रमण आल्याने वाहनधारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नव्हे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. धाड हे गाव शासन दरबारी अतिसंवेदशील म्हणून गणल्या जाते. छोट्या-मोठ्या कारणांवरुन या ठिकाणी बऱ्याचवेळा जातीय तणाव निर्माण झाले आहेत. वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारी दरम्यान एखाद वाहनाचा धक्का लागून वाद निर्माण होऊन मोठा तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजूस आपल्या हद्दित करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.