आश्वासनाची पूर्तता न झाल्यास रस्त्यावर उतरू - म्हस्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:31 AM2021-01-22T04:31:39+5:302021-01-22T04:31:39+5:30
खडकपूर्णा प्रकल्पाच्या वितरिकेबाबत जिल्हा नियोजन समिती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी गीते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुनील शेळके उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) आणि ...
खडकपूर्णा प्रकल्पाच्या वितरिकेबाबत जिल्हा नियोजन समिती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी गीते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुनील शेळके उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) आणि नितीन सुपेकर अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या उपस्थितीत तातडीने एक बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत ऋषिकेश म्हस्के यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली असता १५ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांची कामे मार्गी लागतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. खडकपूर्णा प्रकल्प विभाग, देऊळगावराजा अंतर्गत गांगलगाव वितरिकेवरील शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भाने गत १७ ऑगस्ट २०२० रोजी अधीक्षक अभियंता बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या दालनात ऋषिकेश म्हस्के व शेतकऱ्यांनी दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन संबंधित विभागाने दिले होते. मात्र, त्या पश्चात ६ महिने उलटूनही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप करीत म्हस्के यांनी १५ डिसेंबरला सहायक अभियंता खडकपूर्णा प्रकल्प चिखली यांच्या कार्यालयात ठिय्या दिला होता. दरम्यान, पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतल्याने काही मुद्याचा निपटारा झाला आहे. तर उर्वरित मागण्या १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन २० जानेवारीच्या बैठकीत म्हस्के यांना देण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर म्हस्के यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.