रस्त्याची दुरूस्ती न केल्यास खड्यात लावणार बेशरमची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:46 PM2018-07-23T12:46:47+5:302018-07-23T12:48:02+5:30
१ आॅगस्ट रोजी रस्त्यामधील खड्यामध्ये बेशरमचे झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा विष्णु ढोले यांच्यासह इतरांनी २१ जुलै रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
मेहकर : तालुक्यातील अंजनी बु. गावामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्यामुळे गावकरी हैराण झाले आहे. त्यामुळे अंजनी बु. गावातील खड्डे बुजवन रस्त्याची दुरूस्ती करावी, अन्यथा १ आॅगस्ट रोजी रस्त्यामधील खड्यामध्ये बेशरमचे झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा विष्णु ढोले यांच्यासह इतरांनी २१ जुलै रोजी निवेदनाद्वारे दिला आहे. अंजनी बु. या गावातील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. या खड्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्याच्या बाजुला व्यवस्थीत नाल्या नसल्याने नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहते. अनेक ठिकाणी घाणपाण्याचे गटार तयार झाले आहे. अशा घाण पाण्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रस्त्यात असलेल्या खड्यात पाणी साचत असल्याने खड्डा नेमका किती खोल आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात. रस्त्यावरील खड्डे बुजवावे व रस्त्याची दुरूस्ती करावी यासाठी ग्रामपंचायत कडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. मात्र या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे खड्डे बुजवून रस्त्याची दुरूस्ती करावी, अन्यथा १ आॅगस्ट रोजी रस्त्यातील खड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून आंदोलन करण्याचा इशारा विष्णु ढोले, नकुल राऊत, विजय इरतकर, रवि आल्हाट, राम गुंधे, दत्ता लोखंडे, राम राऊत, गजानन नागोलकर, अशोक नागोलकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
- माझ्याकडे ४ महिन्यापासून पदभार आलेला आहे. तेव्हापासून गावात नाल्या सफाई तीन रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी कामे सुरू आहे.
- भगवानराव काळे पाटील ग्राम विस्तार अधिकारी अंजनी बु.