Buldhana Bus Accident : ...तर वाचले असते काही प्राण, समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 08:22 AM2023-07-01T08:22:10+5:302023-07-01T08:44:55+5:30
Buldhana Bus Accident : बस पेटली असताना सुमारे अर्धा ते पाऊण तास कोणतीच मदत मिळू न शकल्याची माहिती समोर येत आहे.
सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) - समृद्धी महामार्गावरील तुरळक वाहतूक व संसाधनांचा अभाव यामुळे उशिरा माहिती मिळाल्याने व मदतही उशिरा पोहोचल्याने नागपूर येथील खासगी बसच्या अपघाताची तीव्रता वाढून गेल्याची बाब समोर येत आहे.
समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजिक शनिवारी भल्या पहाटे खासगी बसचा अपघात झाला. यानंतर बस पेटली असताना सुमारे अर्धा ते पाऊण तास कोणतीच मदत मिळू न शकल्याची माहिती समोर येत आहे. बसचा एक चालक कसा तरी काच फोडून बाहेर पडल्यावर त्याने फोन करून माहिती देईपर्यंत व मदत घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठी जीवितहानी घडून गेली. यावेळी सदर मार्गावरून व घटनास्थळावरून कोणती वाहने गेलीत, त्यांनी ही घटना बघून मदतीसाठी काही प्रयत्न केले नाहीत का? असे प्रश्न आता समोर आले आहेत.
मध्यरात्रीच्या वेळी मुळात या मार्गावर वाहतूक अतिशय तुरळक असते, त्यामुळे सदर अपघाताची माहितीच न झाल्याने व जवळचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यास लागण्यापूर्वी ऐनवेळी घटनास्थळी मदतीस धावून जाणारे अन्य कोणीच नसल्याने या दुर्दैवी घटनेतील नुकसानीची तीव्रता वाढून गेली. जर तातडीने माहिती मिळवून मदत पोहोचली असती तर आग विझवून किंवा गाडीच्या काचा फोडून काही जीव वाचविता आले असते.
दरम्यान, पिंपळखुटा गावातील दोन जण पहाटे मोठा आवाज आल्याने समृद्धी महामार्गावर धावून गेले होते. परंतू आग लागल्यानंतर लगेच ती भडकल्याने ते दोघेही हतबल झाले होते. त्यामुळे त्यांना मदत करता आली नाही. त्या दोघांनीच नंतर सिंदखेड राजा पोलिसांना अपघाताची माहिती दिली होती.