नगरपालिकांचे बालोद्यानांकडे दुर्लक्ष
By Admin | Published: November 14, 2014 12:14 AM2014-11-14T00:14:09+5:302014-11-14T00:14:09+5:30
बुलडाणा जिल्ह्यात उद्यानांची बकाल अवस्था, खेळण्यासाठी मैदानेही नाहीत.
बुलडाणा : बालगोपालांना खेळण्या बागडण्यासाठी शहरात बालोद्यान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकांची आहे; मात्र जिल्ह्यातील खामगाव वगळता एकाही शहरात बालकांसाठी सुसज्ज असे बालोद्यान नसल्यामुळे सुटीच्या काळात बालकांना घराच्या अंगणात अथवा मोकळ्या प्रांगणाचा वापर करावा लागतो. बुलडाणा नगरपालिकेने कारंजा चौकात बालकांसाठी व्यास बालोद्यान उभारले आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे बालोद्यान भकास झाले आहे. येथे लहान बालके फिरकतसुद्धा नाहीत. दोन वर्षांपूर्वीच हुतात्मा स्मारकाजवळील जागेत बालोद्यान पालिकेने सुरू केले आहे; मात्र याकडेसुद्धा पालिकेचे दुर्लक्ष हो त आहे. बुलडाणा अर्बनने पालिकेच्या बगीच्यात ट्रेन सुरू केली आहे; मात्र या व्यतिरिक्त पालिकेने कुठल्याही सुविधा दिल्या नसल्याने येथेही बच्चे कंपनीचा ओढा नसतो. नांदुरा नगर परिषदेच्या मालकीचे दोन बगीचे आहेत. यातील मलकापूर रोडवर असलेला बगीचा पुर्णत: सुकलेला असून, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. स्थानिक नागरिक त्या जागेवर मंदिर उभारण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मंदिराचे अर्धवट कामसुद्धा झालेले आहे. शिक्षक कॉलनी भारतीय ज्ञानपीठ हायस्कूलजवळ असलेल्या झाशीची राणी बगीचाची ठेकेदार मोहता हे स्वखर्चाने देखभाल करीत असल्यामुळे या बगीच्यामध्ये हिरवळ दिसून येते. काही प्रमाणात त्याठिकाणी बालकांसाठी खेळण्याचे साहित्यसुद्धा आहे. नगर परिषदेचे मात्र यामध्ये कुठलेही योगदान नाही. एक आदर्श बाल संस्कार केंद्र म्हणून ज्याचा उल्लेख व्हावा, अशा मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीत बालउद्यानच नाही, नगरपालिकेच्यावतीने आजपर्यंत कोण तेही प्रयत्न येथे होताना दिसत नाही. येथे वनविभागाचे उद्यान असून, त्याला वाळवी लागली आहे. नगरपालिकेने राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर उद्यान तयार केले आहे, ते फक्त पर्यटकांसाठीच; परंतु तेथे बसण्याची व्यवस्था नाही व लहान मुलांनाही खेळण्याचे साहित्य नाही.