अवैध रेतीसाठ्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:20+5:302021-05-25T04:38:20+5:30
एक कोटी लीटरच्या वर दारू विक्री बुलडाणा : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. मात्र दारू विक्री ...
एक कोटी लीटरच्या वर दारू विक्री
बुलडाणा : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. मात्र दारू विक्री जोमात सुरू आहे. ग्रामीण भागातही दारू सहज उपलब्ध होत आहे. कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये एक कोटी ३८ लाख १२ हजार ८८७ लीटर दारू विक्री झाली आहे.
कोरोना मृतांच्या आकडेवारीवरून संभ्रम
बुलडाणा : कोरोना मृतांच्या शासकीय आकडेवारीवरून संभ्रम निर्माण होत आहे. शहरात खासगी दवाखान्यातील आणि शासकीय कोविड सेंटरमधील एकूण आकडेवारीचा ताळमेळ जुळत नाही.
सोयाबीनच्या तेलालाही महागाईचा भडका
बुलडाणा : सोयाबीन तेतालाही महागाईचा भडका बसला आहे. सोयाबीन तेलाचा १५ किलोंचा डबा २ हजार ४०० रुपयांवरून २ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. खाद्यतेलाने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात १०८ शेततळी
सिंदखेड राजा : शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शेततळ्यांवर भर देण्यात येत आहे. २०१९-२० मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी ही सिंदखेड राजा तालुक्यात झाली आहेत. एकट्या सिंदखेड राजा तालुक्यात १०८ शेततळ्यांचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत ही शेततळी तयार करण्यात आली आहेत. त्यांचा शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी चांगला उपयोग होत आहे.
लॉकडाऊनमुळे फळ उत्पादकांचे नुकसान
मेहकर : लॉकडाऊनमध्ये वाहतुकीची सेवा उपलब्ध झाली नसल्याने फळबागधारक शेतकऱ्यांना फटका बसला. बाजारपेठेत माल नेता येत नाही. त्यामुळे फळे सुकायला लागली. मिळेल त्या भावाने फळांची विक्री सुरू केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
लाइनमनअभावी शेतकऱ्यांची कामे रखडली
बीबी : जिल्ह्यातील काही भागामध्ये अनेक दिवसांपासून महावितरणने लाइनमन दिलेला नाही. लाइनमन नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहेत. लॉकडाऊनचा बहाणा करून नवीन मीटरची अनेक कामे महावितरणने प्रलंबित ठेवली आहेत.
गावाचे निर्जंतुकीकरण; पाणी शुद्धतेकडे दुर्लक्ष
बुलडाणा : ग्रामीण भागात सध्या वारंवार निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. काही विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही. पाणी शुद्धतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
बुलडाणा : शहर परिसरातही आता दिवसभरात कित्येकदा वीज गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणातील उकाड्यामुळे कुलर, पंख्याची गरज भासते. मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने जीवाची तगमग होते.
बाजरी मळणीची कामे अंतिम टप्प्यात
बुलडाणा : तालुक्यातील धामणगाव परिसरात उन्हाळी बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. सध्या या पिकांची काढणी सुरू आहे. थ्रेशर मशीनद्वारे बाजरीची मळणी करण्यात येत आहे. बाजरी मळणीची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत.
नालेसफाईची कामे सुरू
डोणगाव : परिसरातील अनेक ग्रामपंचायतींच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ही कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.