मोताळा तालुक्यातील राजूर येथे बेकायदेशीर गर्भपात; दोन गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:25 AM2017-12-21T01:25:39+5:302017-12-21T01:26:29+5:30
मोताळा : परराज्यात गर्भलिंग निदान करून मोताळा तालुक्यातील राजूर येथे अर्हता नसलेल्या एका डॉक्टरकडून महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : परराज्यात गर्भलिंग निदान करून मोताळा तालुक्यातील राजूर येथे अर्हता नसलेल्या एका डॉक्टरकडून महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही आरोपींची २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय अर्हता नसलेल्या ब्रिजलाल सुपडा चव्हाण (५0, रा. गुळभेली) आणि डॉ. सय्यद आबिद हुसैन सय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा) या दोन आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील एका महिलेचे परराज्यात गर्भलिंग निदान करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या गर्भपातासाठी मोताळा तालुक्यातील ब्रिजलाल सुपडा चव्हाण याच्याशी संपर्क केला होता. राजूर येथे संबंधित महिलेचा बेकायदेशीर गर्भपात त्याने केला; मात्र महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला बुलडाणा येथील डॉ. सय्यद आबिद हुसैन याच्याकडे नेण्यात आले. तेथे त्याने महिलेवर उपचाराचा प्रयत्न केला; परंतु महिलेची प्रकृती नाजूक झाल्याने तिला अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील रुग्णालयातील वैद्यकीय चमूने या प्रकरणाची माहिती बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयास दिली. सोबतच गंभीर महिलेवर यशस्वी उपचारही केले.
या प्रकरणात मोताळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे यांच्या तक्रारीवरून १७ डिसेंबर रोजी बोलाखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनोने, नरेश रेड्डी यांनी बुलडाणा पोलिसांच्या मदतीने मंगळवारी डॉ. सय्यद आबिद हुसेन यास बुलडाण्यातून अटक केली. दरम्यान, दुसरा आरोपी अन्य एका बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात धामगाव बढे पोलिसांच्या कोठडीत होता. त्याचीही पोलीस कोठडी २0 डिसेंबरला संपल्यानंतर त्यास बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २६ डिसेंबरपर्र्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.