बुलडाण्यात अवैध कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2017 02:50 AM2017-02-04T02:50:28+5:302017-02-04T02:50:28+5:30
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. 0३- शहरात अवैध कोचिंग क्लासेसचे प्रमाण वाढले असून यामध्ये सरकारी व खासगी संस्थेवर काम करणार्या शिक्षक, प्राध्यापकांचा समावेश आहे. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होत असून शिक्षण विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
स्पर्धेचे युग असल्यामुळे आपला पाल्य कुठेही कमी पडू नये म्हणून पालकांचे प्रयत्न असतात. सीईटी, नीट, जेईई आदी परीक्षेत चांगले गुण आवश्यक असतात. यासाठी कोचिंग क्लासेसचा आधार घेतला जातो. पालकांच्या मानसिकतेचा फायदा उचलून क्लासेसवाले अव्वाच्या सव्वा पॅकेज घेत आहेत. खासगी अनुदानीत तसेच सरकारी शाळा, कॉलेजमधील जवळपास शंभरावर शिक्षक, प्राध्यापक या क्लासेसध्ये शिकवतात. वेळप्रसंगी ही मंडळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक परीक्षेत कमी गुण टाकण्याची धमकी देतात, अशीही चर्चा आहे. या माध्यमातून दरवर्षी जवळपास ३ कोटी रूपयांची उलाढाल होत असून शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
- अवैध कोचिंग क्लासेसच्या विरोधात यापूर्वी अनेक संघटनांनी आवाज उठवला आहे. हे क्लासेस विद्यार्थ्याकडून भरमसाठ फी घेतात व क्लासला येण्यासाठी सक्ती करतात. शाळा, महाविद्यालयात प्रात्यक्षिकाचे गुण देणार नाही, अशी धमकी देतात. क्लासेसवाल्यांची ही मनमानी थांबली नाही, तर आंदोलन छेडण्यात येईल.
गजानन झगरे, जिल्हाध्यक्ष, कामगार व शेनमजूर संघटना.
- शाळांमधील शिक्षक कोचिंग क्लासेसमध्ये जात असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आदेश संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांना दिले आहेत.
-अशोक सोनोने, शिक्षणाधिकारी माध्यमिक, बुलडाणा.