कृऊबा संचालकाविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:18 AM2017-07-20T00:18:50+5:302017-07-20T00:18:50+5:30
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय माणिकराव गाडेकर याच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय माणिकराव गाडेकर याच्याविरुद्ध अवैध सावकारी सिद्ध झाल्याने सहायक निबंधक सहकारी संस्था चिखली संदीपकुमार रुद्राक्ष यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गाडेकर याच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे तरतुदी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर असे, की चिखली येथील सतीश खबुतरे यांनी २४ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपरोक्त कार्यालयामध्ये प्रकरण चालविल्यानंतर गैरअर्जदार संजय गाडेकर याच्याविरुद्ध २३ आॅगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८ (२) अंतर्गत अवैध सावकारी सिद्ध होऊन जमीन परत करण्यासंबंधाने आदेश पारित करण्यात आलेला आहे.
सदर आदेशात नमूद केल्यानुसार अर्जदार सतीश खबुतरे यांच्या नावावर असलेली बेराळा ता. चिखली येथील गट क्र.१०४ मधील १.८४ हे.आर क्षेत्रफळापैकी ०.९२ आर शेतजमीन खरेदीखत क्रमांक ४१३१/२००६, दि.८ मे २००६ व गट क्रमांक १०१ मधील ०.३८ आर क्षेत्रफळापैकी ०.१९ आर शेतजमीन खरेदीखत क्र. ४१३२/२००६ दि. १२ जुलै २००६ अन्वये गैरअर्जदार सावकार संजय माणिकराव गाडेकर याच्या नावाने सावकारीच्या ओघात प्रतिभूती म्हणून खरेदीखताद्वारे लिहून दिलेली असल्याने उक्त खरेदीखत हे सावकारी अंतर्गत लिहून दिले असल्याचे सिद्ध झाल्याने ते अवैध असल्याचे घोषित करून रद्द केलेले आहे. गैरअर्जदार गाडेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे तरतुदी अन्वये गुन्हा नोंद करण्याबाबत पोलीस स्टेशन चिखली या कार्यालयास सूचित करण्यात आलेले आहे. सबब संजय माणिकराव गाडेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ अन्वये वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात यावा, अशा आशयाची तक्रार सहायक निबंधक संदीप रुद्राक्ष यांनी चिखली पोलिसांत दिल्यावरून पोलिसांनी संजय गाडेकर यांच्याविरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय विक्रांत पाटील करीत आहेत.