खडकपूर्णातून अडीच दलघमी पाण्याची अवैध उचल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 05:15 PM2019-05-16T17:15:49+5:302019-05-16T17:15:54+5:30
खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दीड दशकातील तीव्र अशा दुष्काळाचा सामना करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यतील संत चोखा सागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी जिल्हयात पाण्याच्या चोरी प्रकरणी आठ प्रकरणात कारवाई केली असून सहा प्रकरणात थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान कृषीपंपाचे २५० स्टार्टर्स व मोठ्या प्रमाणावर केबल जप्त केली असल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. आॅक्टोबर २०१८ अखेरच जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता शहरी तथा ग्रामीण भागातील योजनांच्या पाणीपुरवठ्यासाठी ३६.४ दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले होते. सोबतच पाण्याची चोरी होत असल्यास संबंधितांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी त्यावेळी परिस्थितीचे गांभिर्य पाहता दिले होते. त्या पृष्ठभूमीवर पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व महावितरणचे कर्मचारी सतर्क होऊन त्यांनी प्रकल्पांच्या परिसरातील बॅकवॉटरमधून पाण्याची चोरी करणार्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला होता.
यामध्ये लोणार तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पावर एक, खडकपूर्णा प्रकल्पातंर्गत एक, मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प व चिखली तालुक्यातील पेनटाकाळी प्रकल्पावरून अवैधरित्या पाण्याची उचल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी दोन तथा ब्राम्हणवाडा प्रकल्पावर एक अशा जवळपास आठ प्रकरणात कारवाई केली होती. सोबतच केबल वायर, २५० स्टार्टस आणि मोटार जप्त केल्या होत्या. मधल्या काळात ही कारवाई थंडावली होती. मात्र आता यंत्रणा पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. परिणामी कोराडी, पेनटाकळीवरीलहा प्रकार बंद झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
खडकपूर्णावर अद्यापही १०० पंप
विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमधून जालना जिल्ह्यात अद्यापही जवळपास १०० पेक्षा अधिक पंपाद्वारे पाण्याची अवैधरित्या उचल केल्या जात असल्याची ओरड आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी जालना जिल्हा प्रशासनास कल्पना दिल्यानंतरही प्रकरणी कारवाई होत नसल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून मृत जलसाठ्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात अवघा ८.९५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पाची मृतसाठ्याची क्षमता ही जवळपास ६० दलघमी आहे. यावरून पाणीप्रश्नाच्या बिकटतेची कल्पना यावी.