अवैध वाळूउपसा होतोय थेट खडकपूर्णा धरणातून
By निलेश जोशी | Published: May 17, 2024 10:17 PM2024-05-17T22:17:55+5:302024-05-17T22:18:19+5:30
महसूल पथकाचा धरणातील बोटीचा सिनेस्टाईल पाठलाग : खडकपूर्णा धरणात कारवाईचा थरार
सिंदखेडराजा : अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयाने थेट खडकपूर्णा धरण गाठले. येथे वाळूमाफियांचा बोट व फायबर मशिनद्वारे वाळूउपसा सुरू होता. मात्र अधिकारी आल्याचे समजताच बोटचालकांनी आपल्या बोटी मराठवाड्याच्या हद्दीत वळविल्या. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या मोठ्या कारवाईला अपयश आले आहे.
निवडणूक काळात तहसीलदार यांच्यावर वाळू वाहतूकदाराकडून एसीबीचा ट्रॅप लावला गेला होता. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली; मात्र दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत अडकलेल्या प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांना कोणत्याच कारवाया करता आल्या नाही. मात्र आता तहसील कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालयाने अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर लगाम लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रांताधिकारी प्रा. संजय खडसे यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तहसीलदार यांनादेखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शुक्रवारी अशीच एक मोठी कारवाई करण्याच्या बेताने गेलेल्या महसूल व बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकला रिकाम्या हाताने परतावे लागले. खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी प्रा. संजय खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, चालक कैलास चव्हाण यांच्यासह अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथक एक बोट घेऊन खडकपूर्णा धरणाच्या पश्चिम भागातील चिंचखेड गावाकडील धरणाच्या बाजूने पोहोचले. तेथे काही बोटी पाण्यातून प्रेशर फायबर मशिन लावून वाळूउपसा करीत असतानाच या पथकानेही सोबत आणलेल्या बोटीतून पाठलाग सुरू केला; परंतु प्रशासनाची बोट लहान आल्याने बराच वेळ पाठलाग करूनदेखील फायदा झाला नाही.
वाळूमाफियांकडे आधुनिक बोट व यंत्रसामग्री असल्याने त्याचा फायदा घेत ते गुंगारा देण्याच्या नादात देऊळगाव राजाच्या हद्दीकडे आले; पण पाण्यातील मार्ग माहीत असल्याने या बोटी पुन्हा जाफराबादच्या हद्दीत गेल्या व दिसेनाशा झाल्या. ही कारवाई फत्ते झाली असती तर रेतीचा अवैध उपसा करणारी मोठी यंत्रसामग्री प्रशासनाला नष्ट करता आली असती; परंतु यंत्रणा त्यात कमी पडली.
--वाळूचा अवैध उपसा रोखण्यासाठी कारवाई करणारच--
अवैध वाळू उपसा करून शासनाला गंडा घालणाऱ्या प्रत्येक माफियांवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करणार आहोत शुक्रवारच्या कारवाईत आमच्या हाती वाळू वाहतूकदार लागले नाही. यासंदर्भात जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तहसीलदार यांना कल्पना दिली आहे. पुढे अधिक सजग राहून कारवाई करू, असे एसडीअेा प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.