गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक
By admin | Published: October 2, 2014 11:57 PM2014-10-02T23:57:22+5:302014-10-02T23:57:22+5:30
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल : २ लाख रुपयांचा माल जप्त.
मेहकर (बुलडाणा) : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक जोमात सुरू आहे. डोणगाव रोडवरील स्थानिक क्रीडा संकुलाजवळ नुकतेच घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले असून, त्यामध्ये २ लाख २0 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच एएसआय दीपक साळवे यांनी डोणगाव मार्गावरील क्रीडा संकुलजवळ नाकाबंदी केली. दरम्यान, विना परवाना घरगुती वापराचे दहा गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी एम.एच.३0 ए.४२५५ क्रमांकाची ओमनी कार पकडली. त्यामध्ये मेहकर येथील विनोद हरिभाऊ महाले (३0) व संतोष आनंदराव साने (४५) यांच्या ताब्यातील गॅस सिलिंडरसह ओमनी कार असा २ लाख २0 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना मेहकर पोलिसांनी अटक केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर शहरातील हॉटेल्समध्येसुद्धा घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर होत आहे. यावर प्रशासन कारवाई करण्यास धजत नसल्याने घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक व हॉटेल्समध्ये वापर करणे सोपे झाले आहे. कुठे घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक आढळून आली, तर प्रकरण ति थेच निपटविण्याच्या नादात काही शिलेदार व्यस्त असल्याचेही आढळून येते. प्रकरणाच्या तडजोडीमध्ये कारवाई करण्यासही विलंब होत असल्याचा प्रकार येथे पाहावयास मिळत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.